धामणगावात खाटू नरेश श्याम‎बाबांचा जन्मोत्सव उद्यापासून‎:विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खाटू नरेश श्री श्यामबाबा यांच्या दोन दिवसीय जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी (दि. १२) जे. बी. पार्क स्थित श्री बालाजी खाटूश्याम मंदिरात महोत्सवाला सुरुवात होईल. महोत्सवासाठी श्यामबाबांच्या मूर्तीची रंगबिरंगी फुलांनी आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली. महोत्सवाप्रसंगी छप्पनभोगसह मंगळवारी सायंकाळी ६ वाजता रोहित मिश्रा यांची श्री श्याम भजन संध्या आयोजित केली आहे. त्यानंतर महाआरती व छप्पन भोग प्रसाद वितरण होईल. या मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या श्री बालाजी खाटूश्याम सेवा समितीतर्फे ५-७ दिवसांचा रंगबिरंगी फागून मेळा आयोजित केला जातो. ज्यामध्ये प्रसाद स्वरुपात लंगर, श्याम भजन गायकांची भजन संध्या, समाजप्रबोधनपर भजन कीर्तने आयोजित केली जातात. वर्षभरात निराधार, अपंगांना मोफत घरपोच चहा दिला जातो. ज्याची संख्या ५० ते ५५ हजारांपर्यंत गेली आहे. महिलांसाठी योग वर्ग, आरोग्य शिबिरे यासारखे उपक्रम आयोजित केले जातात. मोठ्या संख्येने भाविकांनी दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. जन्मोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन खाटू नरेश श्यामबाबांच्या जन्मोत्सवानिमित्त गुलजारीलाल शर्मा यांच्या निवासस्थानापासून मंगळवारी टिळक चौकातील श्याम दरबार येथून सकाळी ९ वाजता निशाण यात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी दिग्रसचे श्याम भजन गायक गौरीश शर्मा, गोविंद दिनेश शर्मा, सार्थक शर्मा यांची भजन संध्या होईल. मंगळवारी व बुधवारी शहरातील शिवाजी वॉर्डातील बृजमोहन शर्मा यांच्या निवासस्थानीही श्री श्याम जन्मोत्सवाचे आयोजन केले आहे.

Share