आपला हा देखावा कशासाठी?:सामुहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर चाकणकरांचा हल्लाबोल

पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेतील आरोपींचा पोलिसांकडून अद्यापही शोध सुरु आहे. या घटनास्थळावर मंगळवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. आपला हा देखावा कशासाठी? असा सवाल करत पुण्यात असुनही स्वत:च्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले, असे म्हणत चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांसोबत बोपदेव घाटातील घटना घडलेल्या जागेची पाहणी केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी घाट परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पोलिसांना दिले, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले होते. सुप्रिया सुळेंच्या घटनास्थळाच्या पाहणीवरुन रुपाली चाकणकरांनी टीका केली. झोपी गेलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? संबंधित घटनेला घडून पाच दिवस झाले, पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले, मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून 12 टीम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत. मग आपला हा देखावा कशासाठी? आपल्या माहितीसाठी, चंद्रपुरमध्ये कोरपना येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे, याविरोधात आंदोलन कधी करणार?, असेही चाकणकर म्हणाल्या. आपल्या सोशल मीडियाच्या प्रदेश सरचिटणीसवर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे, पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी चार सायबर गुन्हे दाखल आहेत, पोलिस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता, नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी करणार? कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला, जे आपल्यासोबतचे पदाधिकारी आहेत, यांच्याविरोधात आंदोलन, पत्रकार परिषद कधी घेणार? असा सवाल चाकणकरांनी विचारला आहे. झोपी गेलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना नाही, म्हणून आपल्या माहितीसाठी NCRB चा काल प्रकाशित झालेला अहवाल देत आहे, असे म्हणत रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. नेमके प्रकरण काय‌? 21 वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील बोपदेव घाट परिसरात फिरायला गेली होती. रात्रीच्या वेळी पुणे कसे दिसते हे तिला पहायचे होते. बोपदेव घाट परिसरात पीडित तरुणी आणि तिचा मित्र गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी तिघे जण तिथे आले. त्यांनी पीडिता आणि तिच्या मित्राला शस्त्राचा धाक दाखवत तरुणाला मारहाण केली. आरोपींनी तरुणाचा शर्ट काढून त्याचे हात बांधले, तर पॅन्टच्या बेल्टने त्याचे पाय बांधले. त्यानंतर तरुणाला एका झाडाला बांधून ठेवले. यानंतर आरोपींना पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचा शोध घेत आहेत. पीडित तरुणी ही परराज्यातील असून तिचा मित्र जळगाव जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून शोध सुरु आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखाचे बक्षीस दरम्यान, संशयित आरोपींची रेखाचित्र देखील जारी करण्यात आले. रेखाचित्रांच्या आधारे पोलिसांचा आरोपींना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या 3 हजार मोबाईलधारकांची माहिती जमा केली आहे. तर 200 पेक्षा अधिक संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली आहे. यामुळे पोलिस खात्याच्या वतीने आरोपींची माहिती आणि पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आरोपींची नावे आणि पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड केली जाणार नाही, असे आश्वासन देखील पोलिसांनी दिले आहे.

Share

-