पवना धरणात बोट उलटून दोघांचा मृत्यू:बंगला मालक, बोट मालक यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवना धरणात बोट उलटून दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यूप्रकरणी बंगला मालकासह बोटीच्या मालकाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार अहिरे, मयूर भारसाके (दोघे मूळ रा. भुसावळ, जि. जळगाव) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. तुषार आणि मयूर मित्रांसोबत पवना धरण परिसरात बुधवारी (४ डिसेंबर) फिरावयास गेले होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ त्यांनी लेक एस्केप व्हिला बंगला भाड्याने घेतलेला होता. बंगल्याच्या परिसरातून धरणाच्या पाणलोटात उतरण्यासाठी मार्ग आहे. पाणलोट क्षेत्रात दोन बोटी लावल्या होत्या. या बोटी मधून तुषार, मयूर आणि त्याचे मित्र बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फिरायला गेले. अचानक बोट उलटली. तुषार आणि मयूर पाण्यात पडले. दोघांनी पोहत बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू पथक आणि मावळ वन्यजीव रक्षक संस्थेतील स्वयंसेवकांनी दोघांना बाहेर काढले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. बंगला, तसेच बोटीच्या मालकाच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याची फिर्याद तरुणांच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. मोबाइल चोरणारी टोळी जेरबंद, १० मोबाइल जप्त पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्यासह साथीदारांना लष्कर पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून दहा मोबाइल जप्त करण्यात आले. शाहरूख सलाउद्दीन खतीब (वय २४, रा. भाग्योदय नगर, कोंढवा), सलीम हसन शेख (वय २४), सर्फराज पाशा शेख (वय २२), अजीम बबलू शेख (वय २०, तिघे रा. कासेवाडी, भवानी पेठ,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ३ डिसेंबर रोजी लष्कर भागातील एका मोबाइल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १० मोबाइल चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. चित्रीकरण, तसेच खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खतीब आणि साथीदारांनी मोबाइल दुकानात चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसंच्या पथकाने सापळा लावून चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून दहा मोबाइल जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिशकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक प्रदिप पवार, उपनिरिक्षक राहुल घाडगे, महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिर्डे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम, हराळ, कोडिलकर, अलका ब्राम्हणे यांनी ही कारवाई केली. —

Share