पवारांवर बोलायलाच नको, भूमिकाही लाजते:राज ठाकरेंचा शरद पवारांना खरमरीत टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा पार पडली. संदीप देशपांडे यांना या जागेवरून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरे म्हणाले, संदीप देशपांडे यांच्यासाठी ही दुसरी सभा घेत आहे. मतदारसंघात दोन-दोन सभा मी खूप कमी घेतल्या आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवारांवर देखील जोरदार टोला लगावला आहे. सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, शरद पवार हे आयुष्यभर भूमिका बदलत गेले, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको भूमिका पण लाजते, असा टोला लगावला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजकीय इतिहासाची उजळणी केली. शरद पवारांनी कशा भूमिका बदलल्या यावर त्यांनी भाष्य केले. पुढे ते म्हणाले, मी माझ्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या नाहीत. या देशातला पहिला माणूस मी होतो की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे अशी भूमिका घेतली. तसेच त्यांनी मोदींच्या विरोधात देखील भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांची बॅग तपासणीचा व्हिडिओ काढल्यावर त्यावर अनेक नेत्यांचे आता बॅग तपासणीचे व्हिडिओ समोर येत आहेत. यावर राज ठाकरे म्हणाले, बॅग तपासली म्हणून काही जणांचे रडूबाई रडू सुरू आहे. पण, निवडणूक आयोगाला समजायला हवे, त्यांच्या हातामधून पैसे सुटत नाही, त्यांच्या बॅगेतून कसे पैसे निघणार, असा टोला लगावला आहे. पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी अनुशक्ती प्रकल्पाला कोकणामध्ये विरोध केला आहे. आता ऑइल रिफायनरीला विरोध करत आहेत. त्यामुळे ते कोणत्या उद्योगपतीला मदत करत आहेत, हे कोणाचे लग्नाला जातात, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. संदीप देशपांडे यांनी देखील बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र लुटणाऱ्यांसोबत मनसे आहे, असे काल उद्धव ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले. मग गेली 25 वर्षे तुम्ही मुंबई लुटली, या लुटीतून मातोश्री 2 उभी राहिली. कोरोना काळात तुम्ही बॉडी बॅग, खिचडी घोटाळा केला, याचं काय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केला.

Share

-