माओवाद्यांना गावबंदी करणाऱ्या पेनगुंडात 24 तास पोलिस मदत केंद्र:यापुढे माओवादी संघटनांना कसलीही मदत नाही, गावकऱ्यांनी घेतला निर्णय

सध्या नक्षलवाद्यांचा सप्ताह सुरू आहे. नक्षल सप्ताहात अनेक गावे वा गावकरी नक्षल्यांना गावबंदी करतात. भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेनगुंडा गावानेही यावेळी माओवाद्यांना गावबंदी केली आहे. या गावात गडचिरोली पोलिसांनी एक हजार सी–६० कमांडो, २५ बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने २४ तासात नवीन पोलीस मदत केंद्र स्थापन केले. विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्चिम क्षेत्र) सिआरपीएफचे टी. विक्रम, विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, ११३ बटालियन सिआरपीएफचे कमांडण्ट जसवीर सिंग व ग्रामस्थंाच्या उपस्थितीत नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यापुढे गावामार्फत माओवादी संघटनेस जेवण/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही तसेच माओवाद्यांना खोट्या प्रचारास बळी पडणार नाही, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. २००३ पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या लाभामुळे गेल्या काही महिन्यातच गडचिरोली जिल्हयातील एकूण १९ गावांनी माओवाद्यांना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला होता. मिडदापल्ली गावातील ग्रामस्थांनी याआधी यावर्षीच माओवाद्यांना गावबंदीचा ठराव मंजूर केला असून गुरुवारी मिडदापल्लीच्या ग्रामस्थांनी रस्ते, शाळा, पूल आणि मोबाईल टॉवरच्या विकास कामांना आपला पाठिंबा दर्शवत पोलीस विभागाला विकास कामांसाठी सहकार्य करण्याचा ठराव एकमताने केला.

Share