PM ​​​​​​​मोदींची एक भेट अन् थेट आमदारकी:बाबूसिंह महाराज विधान परिषदेवर, भाजपचा बंजारा समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार सर्वज समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याये दिसून येत आहे. मागील काही दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध समाजासाठी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंह महाराज राठोड यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लावली आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवी येथे बाबुसिंग महाराज यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांची आमदारपदी नियुक्ती झाली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपने मोठा डाव खेळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या पाच मजली नंगारा वस्तूसंग्रहालयाचे अनावरण केले होते. या संग्रहालयातून बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा दाखवली जाणार आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी धर्मगुरू बाबूसिंह महाराज राठोड यांच्यासह बंजारा समाजातील प्रमुख संतांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले होते. या भेटीनंतर आज पोहरादेवी शक्तीपीठाचे प्रमुख धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले आहे. काय म्हणाले बाबुसिंग महाराज राठोड? विधान परिषद सदस्यात्वाची शपथ घेण्यापूर्वी बाबुसिंग महाराज राठोड म्हणाले, राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून माझे नाव जाहीर केले. माझी विधान परिषदेवर निवड केल्याबद्दल सर्व बंजारा समाज महायुती सरकारचा ऋणी आहे. माझ्या नियुक्तीमुळे डॉ. रामराव महाराजांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण झाले, असेही त्यांनी नमूद केले. मी या आमदारकीच्या माध्यमातून बंजारा समाजासाठी मनोभावे सेवा करणार आहे, असेही बाबुसिंग महाराज म्हणाले. पोहरादेवी तीर्थक्षेत्राबद्दल थोडक्यात माहिती पोहरादेवी हे वाशिम जिल्ह्यातील एक प्रमुख तीर्थस्थळ आहे. याठिकाणी जगद्गुरू संत सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीचे मंदीर आहे. पोहरादेवी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाते. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांनीही पोहरादेवीला भेट दिली होती. येथे संत रामराव महाराजांची समाधी आहे. त्यांच्यानंतर पोहरादेवी शक्तीपीठाचे उत्तराधिकारी आणि महंत म्हणून बाबुसिंग महाराज राठोड यांची निवड करण्यात आली आहे. याठिकाणी पाच मजली नंगारा वस्तूसंग्रहालय उभारण्यात आले असून त्यामध्ये बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा पाहता येणार आहे. या वास्तूसंग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा दिवसांपूर्वी अनावरण केले होते.

Share

-