पोलिसांसाठी फरार सतीश भोसलेची वृत्तवाहिनीला मुलाखत:सर्व आरोप फेटाळले; अटकपूर्व जामिनासाठी बीड न्यायालयात अर्ज
भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी यांनी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या सतीश भोसले याच्यावर अनेक आरोप होत आहेत. मात्र, तो पोलिसांना सापडलेला नसतानाच एका वृत्तवाहिनीवर त्याने मुलाखत दिली आहे. यादरम्यान त्याने त्याच्यावर होणारे सर्व आरोपी फेटाळले आहे. सर्व प्रकरणातील सत्याचा तपास करा, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलो नाही तर स्वतःहून पोलिसांना शरण जाईल, असेही त्याने वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले आहे. बीडच्या शिरुर येथील एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेवर गुन्हा दाखल केला आहे. आधीच बीड जिल्हा सध्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे गाजत आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. त्यातच सतीश भोसले याचा एका व्यक्तीला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भाजपचा कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता त्याने स्वत: या सर्व प्रकरणात स्पष्टिकरण दिले आहे. सतीश भोसले याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायला होत आहेत. दरम्यान सतीश भोसले याच्या घरावर देखील वन विभागाने छापा टाकला होता. त्याच्या घरामध्ये प्राण्यांना पकडण्यासाठी तयार करण्यात आलेले अनेक सापळे, धारदार शस्त्रे आणि प्राण्यांचे मांस देखील आढळून आले होते. त्यामुळे सतीश भोसले याच्यावर आता अटकेची टांगती तलवार लटकत आहे. मात्र तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. फरार असताना आणि पोलिस त्याचा शोध घेत असताना देखील तो अचानक माध्यमांसमोर हजर झाला. टीव्ही9 या वृत्त वाहिनीला त्याने दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्याच्या वतीने बीड येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. सदरील व्यक्ती वारंवार छेड काढत होता सतीश भोसले याने एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याविषयी बोलताना त्याने सांगितले की, माझा मित्र माऊली खेडकर यांच्या पत्नीची सदरील व्यक्ती वारंवार छेड काढत होता. माझ्याकडे तुझा आंघोळ करतानाचा व्हिडिओ आहे, तो मी व्हायरल करेल, अशी धमकी देऊन महिलेकडे विचित्र मागणी करत होता. हे सर्व माझ्या मित्राने मला सांगितल्यावर मला राग आला आणि मी त्याला मारहाण केली. हे या मागचे खरे प्रकरण असल्याचा दावा सतीश भोसले याने केला आहे. माझी सामाजिक क्षेत्रातील कामे पहा यावेळी सतीश भोसले याने अंजली दमानिया या करत असलेल्या आरोपावर देखील स्पष्टीकरण दिले आहे. दमानिया यांना चुकीची माहिती पुरवली जात असल्याचे ते म्हणाले. मला गुंड कशाला म्हणतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझी सामाजिक क्षेत्रातील कामे पहा. त्या कार्यक्रमातील व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर आहेत. ती पहा, जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते संपूर्ण व्हिडिओ व्हायरल करा, असे आवाहन देखील त्याने केले. त्या शाळेत जा मुलांची चौकशी करा, असे देखील तो म्हणाला. तुम्ही आधी त्याची शहानिशा करा मी 200 हरणांची शिकार केली, असा आरोप माऊली शिरसाट करत आहे. मात्र त्याने त्या वेळी तक्रार का केली नाही? असा प्रश्न सतीश भोसले यांनी विचारला आहे. 200 हरणे हा काही जोक नाही. तुम्ही आधी त्याची शहानिशा करा, असे आवाहन देखील भोसले याने केले आहे. असले लोक माझ्या विरोधात मोर्चा काढतात आणि आंदोलन करतात, त्यांच्यात किती सत्य आहे, हे देखील तपासा. माऊली शिरसाटला स्वतःला मोठे व्हायचे आहे, असा आरोप भोसले याने केला आहे.