पोर्शे अपघात प्रकरण:रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अरूणकुमार सिंग न्यायालयात शरण

पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात कारमध्ये मागे बसलेल्या एका अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर आरोपी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात शरण आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अरुणकुमार देवनाथ सिंग असे त्याचे नाव आहे. कारचालक मुलाच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी या गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी यांनी ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिली. त्यानंतर एका आरोपीने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला, तर आशिष नावाच्या आरोपीने अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलाच्या जागी स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंग याने येथील जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. सुरुवातीला त्याला अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, आता न्यायालयाने त्याचा जामीन दि. 23 ऑक्टोबरला फेटाळून लावला होता. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सिंग याने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सिंग याला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता रक्त बदलण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग दिसत असल्याने जामीन फेटाळून लावला. त्यामुळे आपली अटक निश्चितच असल्याचे मानले जात असतान अरूणकुमारने अधिकच्या पळवाटा न काढता तो स्वतःहून न्यायालयात शरण आला. याप्रकरणात त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असली तरी पोलिस कोणत्याही क्षणी त्याला पोलिस कोठडीसाठी ताब्यात घेऊ शकतात.

Share