संतांची भूमी आणि वीरांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र:छत्रपती शिवाजी महाराजांना मी नमन करतो, पवन कल्याण यांचे मराठीत जोरदार भाषण
तेलुगु सुपरस्टार आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. यावेळी बोलताना त्यांनी मराठीमधून भाषण केले. “मी मराठीत बोलताना चुकलो तर मला माफ करा”, असे पवन कल्याण यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष दिसून आला. पवन कल्याण यांनी शनिवारी पाळज आणि देगलूर येथे सभा घेतली. वीरांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र पवन कल्याण म्हणाले, मी मराठीत बोलताना चुकलो तर मला माफ करा, असे म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. संतांची भूमी आणि वीरांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र. या भूमितील संतांना, छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो. माझ्या लाडक्या भावांना, लाडक्या बहिणींना नमस्कार करतो. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचार वारीसाठी येता आलं, याचा मला आनंद आहे. रामराम महाराष्ट्र. या मराठ्यांच्या भूमीत सन्मान आहे. स्वराज्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान नेत्याच्या भूमीवर आहे, असे पवन कल्याण म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांनी प्रेरित बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत पवन कल्याण म्हणाले, जनसेने या आपल्या पक्षाच्या सात तत्त्वांपैकी एक राष्ट्रवाद आणि प्रादेशिकता यांचे मिश्रण बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांनी प्रेरित असल्याचे ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना पवन कल्याण म्हणाले, या योजनेमुळे महिलांची आर्थिक उन्नती होईल. यावेळी त्यांनी उमेदवारांना निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. पवन कल्याण हे शनिवारी नांदेड जिल्ह्यात भाजप व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. त्यांनी पाळज आणि देगलूर येथे सभा घेतल्या. भोकर येथील भाजपच्या श्रीजया चव्हाण आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारात सभा घेतली तसेच त्यानंतर जितेश अंतापूरकर यांच्यासाठी देगलूर येथे सभा घेतली.