प्रकाश आंबेडकरांना संविधानच कळाले नाही:रोहित पवारांची टीका, म्हणाले – सामाजिक विषयाला राजकीय रंग देणे लोकांना पटणारे नाही
परभणीतील घटना दोन मराठ्यांच्या वादाचा परिणाम असल्याचेवंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. परभणीतील घटना जातीयवादातून घडल्या नाहीत. दोन समाजामध्ये वाद दर्शवणाऱ्यांना संविधानच समजले नाही, असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार म्हणाले, आमच्या सर्वांचा संविधानावर विश्वास आहे. संविधानावर विश्वास नसणारा देशात कुणीही नाही. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना अधिकार दिला आहे. ते अधिकार देतानाही सर्वांना समान वागणूक दिली. संविधानाचा अभ्यास करताना त्यात धर्मवाद दिसत नाही. त्यामुळे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने विधाने करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल किंवा दोन समाजामध्ये वाद दर्शवत असेल, तर त्यांना संविधान समजलेच नाही, अशी टीका रोहित पवार यांनी आंबेडकरांवर केली. हे सर्वसामान्य लोकांना पटणार नाही
आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारी माणसे आहोत. या देशात कुठल्याही प्रकारे जातीवाद, धर्मवाद राहू नये यासाठी प्रयत्न करत आहोत. या सामाजिक विषयाला कुणी नेता राजकीय रंग देत असेल, तर ते सर्वसामान्य लोकांना पटणार नसल्याचेही रोहित पवार म्हणाले. काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
परभणीत बाबासाहेबांच्या पुतळ्यापुढील संविधान ठेवलेल्या पेटीची काच एका मनोरुग्णाने फोडली होती. त्यानंतर मराठा जातीयवादी समाजकंटकांनी केलेली ही तोडफोड लज्जास्पद गोष्ट असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. तर परभणी येथे संविधानाची झालेली विटंबना आणि त्यानंतर झालेली दगडफेक, जाळपोळ याला परभणीतील दोन मराठ्यांच्या भांडणाचा परिणाम असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. याच वक्तव्यावरून रोहित पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांचा समाचार घेतला. परभणीत बंद दरम्यान दगडफेक-जाळपोळ
परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची 10 डिसेंबर रोजी एका माथेफिरूने तोडफोड केली होती. या घटनेविरोधात आंबेडकरी संघटनांनी 11 डिसेंबर रोजी बंद पुकारला होता. बंद दरम्यान आंदोलनाला गालबोट लागले आणि दगडफेक, जाळपोळीसारख्या घटना घडल्या. यामुळे पोलिसांनी जमावावर अंकुश मिळवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला होता. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या होत्या. या घटनेसाठी दोषी कोण यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.