समृद्धी महामार्ग वादाच्या भोवऱ्यात:मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने हजारो शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून समस्या जाणून घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी अशी लेखी मागणी केल्यावरही मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने अखेर पीडित शेतकऱ्यांनी लाखांदूर तालुक्यातील करांडला येथे रविवार, २ मार्च पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यासाठी मार्गातील शेतकऱ्यांशी कोणतीच वाटाघाटी न करता जमीन हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहे.यासंदर्भात अनेकवेळा शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून प्रथम शेतीचे दर तसेच अन्य मागण्या संदर्भात चर्चा करावी ही मागणी केली. मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने फेब्रुवारी महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यावा यासाठी १६ जानेवारीला लाखांदूर तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले होते. मात्र त्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी कोणतीच दखल न घेतल्याने समृद्धी महामार्गातील पीडित शेतकरी विनोद ढोरे यांच्या नेतृत्वात प्रभु मेंढे, जयपाल भांडारकर, व्यंकट बेडेकर, जनार्दन भांडारकर, शिशुपाल भांडारकर, शीतल भांडारकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. लाखांदूर तालुक्यातून भंडारा ते गडचिरोली शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग जात असून संबंधित विभागाच्या वतीने जमीन हस्तांतरीत करण्यासाठी कार्यवाही सुरू केली. मात्र, सदर रस्त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यापूर्वी शेतजमिनीचे किंमत किती मिळणार हे अद्यापही शेतकऱ्यांना कळविण्यात आले नसल्याचे १६ जानेवारीच्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले होते. याशिवाय शासनाने बळजबरीने शेतीची मोजणी करणे सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होते. शेतकऱ्यांच्या मागण्या
१) समृध्दी महामार्गात गेलेल्या शेतजमिनीला प्रती एकर १,३०,००००० रू. भाव मिळावा.
२) समृध्दी महामार्गात गेलेल्या शेतजमिनीचे मालक यांचे कुटुंबातील एका व्यक्तीला शासकिय नौकरीत समाविष्ठ करावे.
३) समृध्दी महामार्गात गेलेल्या शेतजमिनीचे मालक यांना प्रति महिण्याला ३०,००० रू. पेन्शन मिळावी

Share