पुण्यात बांसुरी परंपरा महोत्सव:पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह चार पिढ्यांचे होणार बासरी सहवादन
जगविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य आणि प्रसिद्ध बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘बांसुरी परंपरा’ या अनोख्या सांगितीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित रूपक कुलकर्णी म्युझिक फाऊंडेशन आणि ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशन आयोजित सांगितीक महोत्सव शनिवार, दि. 15 आणि रविवार, दि. 16 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता द पुना वेस्टर्न क्लब, भूगाव, पुणे येथे होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती पंडित रूपक कुलकर्णी म्युझिक फाऊंडेशनचे पंडित रूपक कुलकर्णी, ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशनचे मृगेंद्र मोहाडकर यांनी दिली आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. 15) विदुषी मंजुषा पाटील यांचे शिष्य तनिष्क अरोरा यांचे गायन होणार असून त्यांना दिपिन दास (तबला), आकाश नाईक (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. त्यानंतर मृगेंद्र मोहाडकर आणि जयकिशन हिंगु यांच्या बासरीवादनाची जुगलबंदी रंगणार असून त्यांना सपन अंजारिया (तबला) साथ करणार आहेत. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पंडित रघुनंदन पणशीकर यांचे गायन होणार असून त्यांना पंडित भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 16) पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, रूपक कुलकर्णी यांच्यासह 80 शिष्यांचे बासरी सहवादन होणार आहे. ज्येष्ठ गुरूंसह चार पिढ्यांतील वादकांचे सुमधूर बासरीवादन ऐकण्याची संधी या निमित्ताने संगीत प्रेमींना मिळणार आहे. पंडित अरविंदकुमार आझाद (तबला), सौरभ गुळवणी (बेस तबला), शंतनू पांडे (की-बोर्ड) यांची साथसंगत असणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन गीता बलसारा करणार आहेत.