पुणे क्राईम जगत:दहशतसाठी पिस्तुलातून गोळीबार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; एक जण ताब्यात

किरकोळ वादातून एकाने पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री कोंढव्यातील एका उपहारगृहाजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अब्दुला उर्फ बकलब कुरोशी (रा. सय्यदनगर, महंमदवाडी) याच्यासह दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कौसरबाग परिसरात करीमस् कॅफे येथे शनिवारी रात्री ताहा शेख, नोमान पठाण, अब्दुला आणि आणखी एकजण जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अब्दुला याची मैत्रीण तेथे आली. अब्दुला आणि त्याची मैत्रिणी थोड्या अंतरावर उभे राहून बोलत होते. त्यावेळी तिघे जण तेथे आले. अब्दुला आणि त्याच्या मैत्रिणीला रस्त्यात बोलत थांबू नका, असे त्यांनी सांगितले. या कारणावरुन अब्दुला आणि तिघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तैमुरअली पठाण (रा. गल्ली क्रमांक १४, सय्यदनगर, हडपसर) याने मित्रांना बोलावून घेतले. दहशत माजविण्यासाठी त्यांनी तलवार उगारली, तसेच सिमेंटच्या गट्टूने करिमस् कॅफेसमोर लावलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यावेळी अब्दुलाने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, अब्दुलाने पिस्तुलातून गोळीबार केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. क्रेनच्या धडकेत तरुण जखमी क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना कात्रज चौक परिसरात घडली. सोनू अब्दुल गफूर (वय ३१, रा. सच्चाईमातानगर, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी क्रेनचालक मिथन भगेलूमिया (वय १९, रा. भिलारेवाडी, कात्रज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गफूर याच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने रात्री साडेआठच्या सुमारास तो दुचाकी घेऊन पेट्रोल पंपावर निघाला होता. कात्रज चौकात पाठीमागून आलेल्या क्रेनने गफूरला धडक दिली. क्रेनचे चाक पायावरुन गेले. त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. गफूरला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Share