पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणूक:पॉलिसी क्लेमच्या नावाखाली तरूणीला 13 लाखांचा ऑनलाईन गंडा

पीएनबी मेटलाईफ पॉलिसीबाबत तरूणीला संपर्क करून सायबर चोरट्यांनी विश्वास संपादित करीत तब्बल १३ लाख ३२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ९ जून ते २ ऑगस्ट कालावधीत वानवडीतील परमारपार्कमध्ये घडली आहे. याप्रकरणी सोनल घुले (वय २५) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनल कुटूंबियासह वानवडीतील परमार पार्कमध्ये राहायला आहेत. ९ जूनला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून पीएनबी मेटलाईफ पॉलिसीच्या वार्षिंक प्रीमियमबाबत विचारणा केली. सोनलचा विश्वास संपादित करून सायबर चोरट्यांनी तिच्याकडून पॉलिसी क्लेम करण्यासाठी डी.डीसाठी बँक डिटेल्स पाठवून दिले. त्यानंतर त्यावर पैसे टान्सफर करण्यास भाग पाडून १३ लाख ३२ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक एस जाधव पुढील तपास करीत आहेत. कोयत्याच्या धाकाने बुलेटस्वार तरूणाला लुटले बुलेटस्वार तरूणाचा पाठलाग करीत तिघा चोरट्यांनी त्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना म्हातोबाची आळंदी रस्त्यानजीक घडली आहे. याप्रकरणी विकास शेंडगे (वय ३२, रा. म्हातोबाची आळंदी, हवेली,पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास हा म्हातोबाची आळंदी रस्त्यावरून बुलेट दुचाकीवरून जात होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघा आरोपींनी त्याला थांबविले. टोळक्यापैकी एकाने कोयता काढून, विकासला धमकावून ५ हजारांचे चांदीचे ब्रेसलेट हिसकावून घेतले. त्यानंतर खिशातील १७०० रूपयांची रोकड घेत, बुलेटवर दगड मारून नुकसान केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तपास करीत आहेत.

Share