पुण्याच्या घटनेनंतर कोल्हापूरही हादरले:बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापूर येथे देखील असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहत येथे बंदुकीचा धाक दाखवत एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या नराधम आरोपीने शरीरसंबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. विश्वजित सचिन जाधव असे या नराधमाचे नाव असून त्याच्या विरोधात शाहपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी नराधमाने 2018 पासून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचे समजते. बंदुकीचा धाक दाखवत तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने बलात्कार केला. दोनवेळा इच्छेच्या विरोधात गर्भपात करायला लावला असल्याचे पीडितेने सांगितले आहे. पुण्याची घटना ताजी असतानाच कोल्हापूरमधल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तरुणी व महिला असुरक्षित असल्याचे अधोरेखित होत आहे. बदलापूर घटनेनंतर या घटना कमी होण्याच्या ऐवजी वाढतच जात असल्याचे दिसत आहे. पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात तर अक्षरशः शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे. स्वारगेट बसस्थानक तसे वर्दळीचे आहे, तरीही बलात्कारसारखी घटना या ठिकाणी घडली. पुण्यातील घटनेचा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा अद्यापही फरार आहे. त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट बसस्थानकातील 23 सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान, पोलिस येथील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करत असून आरोपीच्या भावाची चौकशीही पोलिसांनी केली आहे. दत्तात्रय गाडेवर इतरही गुन्हे दाखल आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याने 2019 मध्ये कर्ज घेऊन कार खरेदी केली होती. त्या वाहनातून तो प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असे. यावेळी त्याने एका वृद्धाला लुटले होते. त्याने वृद्धाला निर्जनस्थळी नेले आणि चाकूचा धाक दाखवून लुटले. याप्रकरणी त्याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल आहे.

Share