पुण्यातील घटनेचा सर्वांनीच निषेध केला:चौकशीतून सर्व निष्पन्न होईल, अजित पवारांचा दावा; संजय राऊतांसह मीडियाला दिला सल्ला
पुण्यातील घटनेचा सर्वांनीच निषेध केला आहे. आरोपी आता ताब्यात आला असून त्याच्या चौकशीतून सर्व गोष्टी निष्पन्न होतील, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना देखील प्रत्युत्तर दिले आहे. जो व्यक्ती रोज सकाळी काहीतरी बोलत असतो, त्या सर्वांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही. त्यांचे काही आरोप असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे द्यावेत, पोलिस त्याची चौकशी करतील, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या संदर्भात त्यांनी नांदेड येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशाप्रकारे लोकांसमोर मांडावी, हा मीडियाचा अधिकार आहे. पुणे येथील घडलेल्या घटनेचा सर्वांनीच निषेध केलेला आहे. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्या नराधमाला ताबडतोब अटक झाली पाहिजे यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. रात्री एक वाजता त्याला अटक झालेली आहे. पोलिसांच्या ताब्यात तो आलेला असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सर्व निष्पन्न होईल, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. या संदर्भात सकाळी पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. त्याला एक वाजता ताब्यात घेण्यात आले असल्याचे त्यांनी मला सांगितले. तसेच त्याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी मला सांगितले आहे. असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. या संदर्भातल्या बातम्या विकृत व्यक्ती देखील पाहत असते. त्यामुळे आपण कशा पद्धतीने बातम्या कराव्यात? याचा निर्णय घेत माध्यमांनी विचार करायला हवा. थोडे तारतम्य सर्वांनीच ठेवायला हवे. राजकीय लोकांनी आणि मीडियाने देखील तसे तारतम्य ठेवायला हवे, असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला आहे. आरोपीला पकडण्याच्या बातम्या करताना या बातम्यांचा उपयोग त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांना टोला ज्या व्यक्तीचे नाव तुम्ही घेत आहात, तो रोज सकाळी नऊ का दहा वाजता बोलत असतो. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही. त्यांनी केलेल्या आरोप संदर्भात काही तक्रार असेल तर त्यांनी नावानिशी तक्रार दिली तर पोलिस त्याची चौकशी करतील, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.