मतदानाआधीच आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह?:कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवल्याचा आरोप; फुलंब्रीमधील धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आता अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी निवडणूक कर्मचारी नेमले जातात तसेच प्रत्येक मतदारसंघात इलेक्शन ड्यूटी बजावण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. तशीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी विधानसभा मतदारसंघात देखील करण्यात आली होती. मात्र कर्मचाऱ्यांना एवढे काम करूनही जेवण न मिळाल्याचे समोर आले आहे. तसेच येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील घरून डबा मागवून जेवण केल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमुळे नाराजी पसरली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी विधानसभा मतदारसंघात युनिव्हर्सल हायस्कूल येथे निवडणूक कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. यावेळी पीआरओ अधिकाऱ्यांनी येथील तहसीलदारांना फोन करत जेवणाची व्यवस्था नसल्याची तक्रार केली. मात्र तहसीलदार यांनी जेवणाची वेळ 11 पर्यंतच होती असे सांगितले. मात्र गेल्या एक तासापासून जेवण नसल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले, त्यावर आम्ही तुम्हाला दोन वेळ जेवण देणार असे सांगितले, मात्र तत्पूर्वी सगळे साहित्य घेऊन आधी मतदार केंद्र इंस्टॉल करा, त्यानंतर जेवण देऊ असे तहसीलदारांनी सांगितल्याचे संभाषणातून दिसून आले. तसेच आधी काम करा मग जेवण मिळेल, असे सांगितल्यावर आम्ही उपाशी जावे का, असा प्रश्न कर्मचाऱ्याने विचारला मात्र त्यावर कुठलाही प्रतिसाद न देता समोर कॉल कट करण्यात आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तेथील आणखी एकाला जेवणाची व्यवस्था करण्याची मागणी केली, तेव्हा त्यांनी देखील आधी साहित्य नेण्यासाठी सांगितले. जवळपास 80 टक्के लोक जेवले नसल्याची देखील कर्मचाऱ्यांनी तक्रार केली आहे. तसेच जेवणानंतर गोळ्या देखील घ्यायच्या होत्या, मात्र जेवणच उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फुलंबरी विधानसभा मतदारसंघात झाल्याचे दिसत आहे.