अपयशी ठरलो तर दुकान बंद करणार – राज ठाकरे:एकदा संधी देण्याचे भावनिक आवाहन, म्हणाले – जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणार
देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची दशा होऊन बसली. तुमचा स्वाभिमानी कणा हा मतदानाशिवाय जागृत राहायला पाहिजे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचा असल्याचे मी 2006 च्या माझ्या पहिल्या सभेत सांगितल्याचे राज ठाकरे म्हणालेत. आत्तापर्यंत तुम्ही अनेकांना संधी देऊन पाहिली. तशीच एकदा राज ठाकरेंच्या हातात महाराष्ट्र देऊन बघा. जर नालायक ठरलो तर समोर येणार नाही आणि दुकान बंद करून टाकणार असल्याचे राज ठाकरे वरळीतील सभेत बोलतांना म्हणालेत. सत्ता नसताना अनेक कामे केली राज ठाकरे म्हणाले, मनसैनिकांनी आतापर्यंत मेहनत घेऊन अनेक आंदोलने केली. सत्तेत नसतांनादेखील आम्ही कामे केली. दुकानावरच्या पाट्यांसाठी आंदोलन केले, तेव्हा प्रत्येक पाट्यांवर मराठी नाव आले. मोबाईल फोनवर फक्त हिंदी आणि इंग्रजी येत होते, पण दणका दिल्यानंतर मराठी कानावर ऐकू यायला लागले, सत्तेत नसताना मनसेने रिझल्ट दिले आहेत. मशिदीसमोरच्या भोंग्याचा त्रास अनेकांना होत होता, उद्धव ठाकरेंचे सरकार होते, तीन वेगवेगळ्या प्राण्यांचे सरकार होते. महाराष्ट्रभर आंदोलन केले, अनेकांनी स्वतःहून बंद केले. माझ्या 17 हजार सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या. एका मुस्लीम पत्रकाराने सांगितले तुम्ही भोंगे बंद केले म्हणून माझा लहान मुलगा आज शांत झोपतोय. कोणत्याही धर्माचा दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्रास होता कामा नये. राज्यातील पोरांना नोकरी मिळवण्याची आंदोलन केले ते पुढे म्हणाले- उत्तरप्रदेश आणि बिहारमधून भरतीसाठी मुले महाराष्ट्रात यायची, त्यांना नोकऱ्या मिळायच्या. माझ्या राज्यातील मुलांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आम्ही आंदोलन केले आणि आंदोलनानंतर आपल्या पोरांना नोकऱ्या मिळू लागल्या. इतर पक्षांना तुम्ही कधीच विचारले नाही. शेतकरी आत्महत्या करतात, महिला असुरक्षित आहेत, लहान मुलींवर बलात्कार सुरू आहेत, मनसेने हे प्रकरणं बाहेर काढल्यानंतर जगासमोर आली. कोणत्या वातावरणात जगताय तुम्ही. कसल्या निवडणुका घेऊन बसलोय आपण. नुसतं उन्हातान्हात उभे राहताय पदरी काही पडत नाहीये. पुढील दोन दिवसात मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले की, पुढच्या 2 दिवसांत मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. त्यात एक गोष्ट प्रामुख्याने आहे, ती म्हणजे राज्यातील एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही. रस्त्यांवरील नमाज पठणही बंद करणार. सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, त्यामुळे लोकांची लक्षात ठेवण्याची ताकद कमी झाली आहे. पण, मनसेने ज्या गोष्टी केल्यात त्या कायमस्वरूपी आहेत. रेल्वे भरतीसाठी मनसेने आंदोलन केले, कारण इथल्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यातील तरूणांना दिल्या जात होत्या. या परिक्षांची इथे जाहिरात दिली जात नव्हती, याला जबाबदार कोण?. इथून दिल्लीत जाणाऱ्या खासदार मंत्र्यानी काय केलं? यावर संसदेत कुणी का बोललं नाही? जर हे नेते महाराष्ट्राच्या उपयोगीच पडणार नसतील तर तुम्ही त्यांना का निवडून द्यायचं? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. बदला घेण्याची हीच योग्य वेळ
ठाकरे म्हणाले- मराठ्यांनी देशावर राज्य केलंय, अटकेपार झेंडे रोवलेत. हिंद प्रांतावर सत्ता गाजवणारा हा एकमेव प्रांत, बाकी सगळे बाहेरून आले होते, सध्या परत तेच सुरूये, कुणीही कुठेही जातंय, विकलं जातंय. इथले दोन उमेदवार तर इथलेच होते, पण गणेश चुक्कल आमचाय तेव्हा संधी परत परत येत नसते, आत्ता गेली तर परत पाच वर्षांनी येणार. आज हा जो चिखल झालाय, सकाळी टिव्हीवर येऊन एकमेकांना शिव्या देतायत, यांना धडा नाही शिकवला, तर त्यांना वाटेल ते जे करतायत ते बरोबर करतायत. हा तुमचा अपमान आहे, त्याचा बदला घेण्याची हीच ती वेळ असल्याचेही राज ठाकरेंनी म्हटले. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती केली उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती केल्यावर स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाच्या मागची ‘हिंदुहृदय’ सम्राट ही उपाधी काढली. इम्तियाज जलीलने हजारो मुसलमानांचा मोर्चा मुंबईत आणला, ही हिंमत का झाली ? कारण काँग्रेस-शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस- उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आलेत. नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी रस्त्यावर उतरून बीभत्स आंनद व्यक्त केला. मागे एकदा अमरावतीत दंगल झाली तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विश्व हिंदू परिषद यांनी दंगेखोर मुसलमानांना सडकून काढले होते. कितीवेळ बाहेर उभे राहून करायचे, माझ्या हाती सत्ता द्या, एकेकाला चांगला सडकून काढेल, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. शरद पवार नामक संताने महाराष्ट्रात जातीजातीत विष पेरले शरद पवारांवरही राज ठाकरे यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले की, हिंदू एकत्र येऊ नये म्हणून शरद पवार नामक संताने महाराष्ट्रात जातीजातीत विष पेरले. जेम्स लेन प्रकरणात महाराजांच्याबद्दल काही वेडीवाकडी वाक्य होती, ते पुस्तक कोणी वाचले होते? त्यावर बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहंदळे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या मजकुरावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पवारांनी भांडारकर संस्थेवर आरोप करवून घेतला की या संस्थेनेच म्हणे ही चुकीची माहीती दिली. पुढे बाबासाहेब पुरंदरेंवर आरोप करून शरद पवारांनी आधी ब्राह्मण-मराठा वाद भडकवला आणि पुढे मराठा-ओबीसी वाद पेटवला. तुम्ही मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून एकत्र येऊ नये ही पवारांची इच्छा आहे.