त्यांच्या बॅगेत हातरुमाल आणि कोमट पाण्याची बॉटल सापडेल:उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणी प्रकरणावर राज ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भांडुप विधानसभेचे उमेदवार शिरीष सावंत यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासले जात असल्याने उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली होती. यावर राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली. त्यांनी केवढा तमाशा केला. बॅगांची तपासणी ही रुटीन प्रोसेस आहे. त्यात तमाशा करण्यासारखे एवढे काय आहे? नाव सांगा, ओळखपत्र दाखवा, नोकरीचे पत्र दाखवा, असे पत्र कुणी खिशात घेऊन फिरते का? उगीच अधिकाऱ्यांना काहीही विचारायचे. बरं अधिकाऱ्यांनी तरी कशाला यांची बॅग चेक करायची, उद्धव ठाकरेंच्या हातून कधी पैसा सुटत नाही, त्यांच्या बॅगेत काय मिळणार? फार फार तर हातरुमाल आणि कोमट पाण्याची बाटली मिळेल, असे म्हणत टोला लगावला आहे. राज ठाकरे म्हणाले, महापालिका यांच्या हातात आहे. शहरांचा विचका करून ठेवलाय. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा त्यांचे बारीक लक्ष होते. परंतु उद्धव ठाकरे यांचे फक्त पैशांवर लक्ष असते. त्यांच्या हातून कधी पैसे सुटत नाही. ह्यांच्या बॅगेत काही नसते, असे म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीवरून बार्शी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. दिलीप सोपल म्हणाले, उद्धव साहेब, तुमच्या बॅग तपासण्यापेक्षा पुलवामामध्ये ज्या गाडीतून स्फोटकं गेली ते तपासले असते तर चाळीस जवान शहीद झाले नसते. तसेच, मशाल घेऊन पेटलेली जनता महायुतीचे अन्याय सरकार उलथून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही सोपल म्हणाले.

Share

-