राज ठाकरेंचा जाहीरनामा:प्रशासन ते शिक्षणापर्यंत सर्वच ठिकाणी मराठी भाषेचा वापर; शिवाजी महाराजांच्या मंदिरावरून उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरे यांच्या जाहीरनाम्यात शिवाजी महाराजांचे मंदिरे उभे करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, शिवाजी महाराजांचे मंदिरे उभी करण्यापेक्षा विद्यामंदिरे उभी करणे जास्त महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांचे संवर्धन होणे, हे महत्त्वाचे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी मी तयार केलेल्या ‘ब्लू प्रिंट’ बाबत मला कायम हिणवले गेले. वृत्तपत्रात त्या विरोधात बातम्या छापल्या गेल्या असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही काय करू शकतो, तसेच ते कसे करणार, याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी भाषेचा वापर करण्यात येणार असल्याचा उल्लेख या जाहीरनाम्यान राज ठाकरे यांनी केला आहे. मूलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा मुद्दा देखील मनसेच्या जाहीरनामात समाविष्ट करण्यात आला आहे. राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासह मैदानी खेळांचा समावेश देखील समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. मागील 19 वर्षात आम्ही काय केले? यावरही एक पुस्तिका काढली असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर आम्ही काय करू या आशयाचा आमचा जाहीरनामा असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. राज्यात सत्ता कोणाची येईल? या बाबत कोणीही सांगू शकत नाही. मात्र, आमची सत्ता आली तर काय करु, या बाबतचा आमचा जाहीरनामा असल्याचे राज यांनी म्हटले आहे. शिवतीर्थावरील सभेला अद्याप परवानगी नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर सभेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अर्ज केलेले आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. इतक्या कमी कालावधीत कशी तयारी करावी? असा प्रश्नही राज यांनी विचारला आहे. निवडणूक आयोग अद्यापही जुन्या जमान्यातच वावरत असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे. झोपडपट्टी पुनर्विसन योजना राज्य सरकारने केली तर.. एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी दावोसमध्ये गेले होते. तेव्हा पाच हजार कोटी रुपयांचे उद्योग महाराष्ट्रात येणार असा दावा केला होता. त्याचे काय झाले? असे शिंदे यांना विचारा, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. झोपडपट्टी पुनर्विसन योजना राज्य सरकारने केली तर त्याचा फायदा राज्याला होईल. अशा योजना बिल्डरांच्या घशात कशाला घालायच्या? त्याचा नफा बिल्डरांना का द्यायचा? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला. जगातून कुठूनही उद्योग आला तर त्यांचे प्राधान्य आधी महाराष्ट्र असते. मात्र महाराष्ट्रातील लोकांना रोजगाराबाबतची माहिती होत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.