राज ठाकरेंच्या मताशी फडणवीस-शिंदे सहमत असतील:संजय राऊत यांचा दावा; म्हणाले – दुसरे कोणी असते तर थयथयाट केला असता

राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यावर केलेल्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केले, त्याचा ऐवजी दुसरे कोणी असे बोलले असते तर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी थयथयाट केला असता. विशेषतः आमच्यापैकी कोणी असते तर आतापर्यंत रस्त्यावर उतरून निषेध झाला असता. असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. इतकेच नाही तर कदाचित राज ठाकरे यांच्या मताशी ते सहमत असतील, असे देखील त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहेत. राज ठाकरे यांनी मधल्या काळात हिंदुत्वाचा पुकार केला होता. अचानक ते भारतीय जनता पक्षासोबत हिंदुत्ववादी झाले होते. मात्र, राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा, काँग्रेसचा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा किंवा आमच्यापैकी कोणी असता तर या विधानावर भारतीय जनता पक्ष आणि मिंदेंची शिवसेना यांनी थयथयाट केला असता, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमच्या विरोधात मोर्चे काढले असते, असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा, असेही ते म्हणाले होते. यावरुन आता राजकारण तापले आहे. राज ठाकरे यांचा पक्ष महायुती आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी हे दोन्ही प्रमुख पक्ष सहमत असतील. त्यामुळे त्यावर त्यांनी मत व्यक्त करायला हवे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. ज्या घोषणांवर मते विकत घेतली, त्या पूर्ण कराव्या लागतील राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्रात कसा कर्जाच्या ओझ्या खाली आहे, हे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची गंभीर स्थिती समोर आली आहे. त्यामुळे या राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत आम्हाला चिंता वाटत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, राज्यकर्ते किंवा सत्ताधारी यांनी मते विकत घेण्यासाठी ज्या पद्धतीने सरकारी तिजोरीचा वापर किंवा गैरवापर केला, तो इतक्या टोकाला गेलेला आहे की, आता त्यांना मागे हटता येणार नाही. ज्या घोषणांवर तुम्ही मते विकत घेतली, त्या घोषणा तुम्हाला या अर्थसंकल्प पूर्ण कराव्या लागतील, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेवर एसआयटी स्थापन करण्याची मागणी महाकुंभ दरम्यान गंगा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत सीपीसीबीच्या नवीन अहवालावर, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, कोणता अहवाल बरोबर आहे हे तपासण्यासाठी एक एसआयटी स्थापन करावी. आधीचा अहवाल कोणी आणला आणि का? त्यांच्या पक्षात घाणेरडे राजकारण सुरू आहे का? असा आरोपही त्यांनी केला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला सादर केलेल्या नवीन अहवालात असे म्हटले आहे की, सांख्यिकीय विश्लेषणानुसार, प्रयागराजमधील नुकत्याच संपलेल्या महाकुंभ दरम्यान पाण्याची गुणवत्ता अंघोळीसाठी योग्य होती.

Share