राणेंनी 10 टक्के कमिशन घेतले:उद्योगपतीच्या तक्रारीनंतर त्यांचे मंत्रीपद नाकारले, विनायक राऊत यांचा गंभीर आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीतील एका प्रतिष्ठित उद्योगपतीने पंतप्रधान कार्यालयाला मेल करून नारायण राणेंनी मंत्रीपद मिळालेल्या खात्याचा बट्ट्याबोळ केला, त्यांच्या पीएने 10 टक्के कमिशन देखील घेतले असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. कुडाळ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचार सभेत बोलताना विनायक राऊत म्हणाले, नारायण राणे यांच्या पीएने 10 टक्के कमिशन घेतल्याची तक्रार करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राची दखल घेत नारायण राणे यांची मंत्रिमंडळात समावेश केला नाही. तसेच नारायण राणे यांनी हे खोटे असल्यास त्यांनी उत्तर द्यावे, असे आव्हान राऊत यांनी केले आहे. विनायक राऊत म्हणाले, इटूकली, बिटूकली, पुटूकली राणेंची काय औकात? राणे तुमची औकात काय? उद्धव ठाकरेंना धमकी देणे सोडा. आज बाळासाहेब असते तर गोळ्या घातल्या असत्या असे म्हणणाऱ्या नारोबाची बाळासाहेबांनी हकालपट्टी केली होती. राणेंनी शिवसेना संपवणार असल्याचे म्हणले होते. त्याच राणेंना 2024 साली मुलाच्या प्रचारासाठी धनुष्यबयन घेऊन दारोदार फिरावे लागत आहे. राणेंना पराभव करण्याचा इतिहास या कुडाळ मालवणमध्ये घडला. त्याच राणेंच्या मुलाला, नीलेश राणे यांचा पराभव करण्याची संधी वैभव नाईक यांना मिळाली आहे. पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेचा पैसा लुबाडण्याचे काम केले. चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र चिपी विमानतळ बंद का याचे उत्तर नारायण राणे यांनी द्यावे. राणेंना चिपी विमानतळ बंद पडले याचा थांग पत्ता लागला नाही. ते विमानतळ पुन्हा मी सुरू करणार. राणेंना त्या विमानतळावरून यायचे नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना इथूनच यायचे आहे, असे राऊत म्हणाले.