रतन टाटा यांचे निधन:राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा; सर्व सरकारी कार्यक्रम रद्द, शासकीय कार्यालयांवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवणार

देशातील आघाडीचे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती मुकेश अंबानी रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले होते. रतन टाटा यांचे पार्थिव कुलाबा येथील त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यानंतर सकाळी 9.45 वाजता त्यांचे पार्थिव कुलाब्यातून नरिमन पॉइंट येथील एनसीपीए येथे नेण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वरळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आज महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रतन टाटा आपल्या देशाचा कोहिनूर – मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “भारताचे रत्न रतन टाटा राहिले नाहीत, ही सर्वांसाठी अत्यंत दु:खद बातमी आहे. त्यांच्याकडून लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले. ते महाराष्ट्राची शान आहेत. त्यांनी हजारो लोकांना मदत केली. रतन टाटा आपल्या देशाचा कोहिनूर होता असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. ते देशभक्त आणि देशप्रेमी होते. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला शोक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “रतन टाटा हे केवळ एक अतिशय यशस्वी उद्योगपतीच नव्हते, तर त्यांनी ज्या पद्धतीने देश आणि समाजासाठी काम केले त्यामुळे ते एक उत्तम व्यक्तिमत्त्वही होते. त्यांनी केवळ यशस्वी उद्योगच नव्हे तर ट्रस्टची स्थापना केली, ब्रँड प्रस्थापित करून आपल्या देशाला जागतिक प्रतिमा देणारी व्यक्ती आज आपल्याला सोडून गेली, हे देशाचे मोठे नुकसान आहे. सर्व कार्यक्रम रद्द – केसरकर सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव दर्शनासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, “उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्य सरकारचे आजचे मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.” रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये झाला रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. 1962 मध्ये टाटा समूहात येण्यापूर्वी रतन टाटा यांनी काही काळ अमेरिकेत काम केले होते. 1981 मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनवण्यात आले. 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर रतन टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले.

Share

-