विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हटवणार:कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी व्यक्त केला निषेध

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषकांसाठी बेळगाव येथे मेळावा आयोजित केला होता. त्याला कर्नाटक सरकारने विरोध दर्शवला तसेच पोलिसांनी जमावबंदी देखील लागू केली होती. जमावबंदीचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला. त्यातच आता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभेत असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवण्याचा निर्णय येथील कॉंग्रेस सरकारने घेतला असल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्या नेतृत्वातइल कॉंग्रेस सरकारने बेळगावच्या सुवर्ण सौधा विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सावरकरांचे कर्नाटकसाठी कोणतेही योगदान नाही असे सरकारला वाटत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील सरकारने विधानसभेत सावरकरांचा फोटो लावला होता. आता कॉंग्रेस सरकारच्या या निर्णयावरून सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. रणजित सावरकर म्हणाले, कॉंग्रेसकडून या पेक्षा काही वेगळी अपेक्षा नव्हती. मात्र या निर्णयाची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागले. कॉंग्रेस टिपू सुलतान यांचे कौतुक करते, अशी टीका रणजित सावरकर यांनी केली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटले की, हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ट्विट करत म्हणाले, ’कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवहेलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे. सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे बावनकुळे म्हणतात, काँग्रेससोबत आघाडी करताना उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे. त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत, त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Share