महामंडळावर काम करण्यास भाजपाच्या वडकुतेंचा नकार:कार्यकर्त्याला पद देऊन काम करण्याची संधी देण्याची विनंती

राज्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी काम करण्यास भाजपाचे रामराव वडकुते यांनी नकार दिला असून या पदावर नवीन कार्यकर्त्याची नियुक्ती करून त्यांना काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे वडकुते नाराज आहेत काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना महामंडळाच्या् अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना अलगद बाजूला सारले आहे. राज्यातील २७ जणांची विविध महामंडळांवर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आचारसंहिता जाहिर होण्याच्या काही दिवस आगोदर या नियुक्त्या करून महायुतीने सावध पवित्रा घेत बंडोबांना थंड करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळावर विजय वडकुते यांची निवड झाल्याचे पत्र महायुती सरकारकडून संबंधित विभागाला देण्यात आले होते. मात्र भाजपाचे रामराव वडकुते यांचे नांव नमुद करण्या ऐवजी विजय वडकुते असे नांव नमुद करण्यात आले होते. मात्र नांवात झालेली चुक लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने एक पत्र पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांकडे पाठविण्यात आले आहे. त्यात या महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय वडकुते हे नजर चुकीने झाले असून रामराव वडकुते असे नमुद केले आहे. दरम्यान, या संदर्भात पत्र प्राप्त झाल्यानंतर वडकुते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे संदेश पाठविला असून त्यात मी सर्वांचा आभारी आहे. मी यापुर्वी दोन वेळा या पदावर काम केल्यामुळे हे पद मला न देता एखाद्या नवीन कार्यकर्त्याला हे पद द्यावे व त्याला काम करण्याची संधी द्यावी असे या संदेशात नमुद केले आहे. दरम्यान, वडकुते यांनी स्वतः सदर संदेश सोशल मिडीयावर प्रसारित केला आहे. त्यांच्या या संदेशमुळे ते नाराज आहेत काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात वडकुते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

Share

-