ऋषी सुनक गेल्यानंतर खलिस्तानींची निगराणी बंद, टास्क फोर्सही सुस्तावले:लंडनमध्ये जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न…

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बुधवारी रात्री लंडनच्या चैथम हाऊसमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम स्थळाहून बाहेर पडताना खलिस्तानी समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. जयशंकर बाहेर येताच खलिस्तान्यांनी पिवळे ध्वज व लाऊडस्पीकरसह निदर्शने केली. सोबतच भारताच्या विरोधात घोषणाबाजीही त्यांनी केली. एका निदर्शकाने जयशंकर यांच्या कारसमोर उडी घेत सुरक्षेचे कडे तोडले. तो त्यांच्या दिशेने गेला. निदर्शकाने तिरंगा फाडण्याचाही प्रयत्न केला. तो जयशंकर यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करत होता. तत्पूर्वीच पोलिसांनी त्यास पकडले. कट्टरवादी गटाची ही कृती प्रक्षोभक असल्याचे भारताने म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल दिल्लीत म्हणाले, अशा प्रकरणांत ‘यजमान सरकार कूटनीतीच्या जबाबदारीचे पालन करेल, अशी अपेक्षा आहे.’
हे पहिल्यांदाच घडलेले नाही. मार्च २०२३ मध्येही भारतीय उच्चायुक्त कार्यालयावरून तिरंगा उतरवला होता. ब्रिटनमध्ये खलिस्तान समर्थक पुन्हा सक्रिय झाले. त्यास ब्रिटनमधील विद्यमान सरकारचे या प्रश्नी असलेले अस्पष्ट धोरण कारणीभूत आहे. ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाच्या सरकारने खलिस्तानवाद्यांसंबंधी कठोर पावले उचलली होती. परंतु नवीन पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाची प्रतिमा खलिस्तानवादी गटांविषयी नरमाईची राहिलेली आहे. त्यामुळे ऋषी सुनक सरकार गेल्यानंतर सगळ्या कारवाया थंड बस्त्यात गेल्या आहेत. ब्रिटन सरकारमध्ये गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान सुनक यांनी जॉइंट-एक्स्ट्रीमिस्ट​​​​​​ टास्क फोर्स सुरू केला होता. परंतु तो आता निष्क्रिय आहे. मजूर पक्ष सत्तेवर आल्यानंतर कार्यदलाची बैठक झाली नाही. पूर्वी कट्टरवाद्यांची निगराणी केली जात होती. ती आता होत नाही. गृह मंत्री येवेट कूपर यांनी अहवालात कट्टरवाद्यांचा उल्लेख केला होता. त्यापुढे काही झाले नाही. स्पष्ट धोरणाचा अभाव असल्याने अधिकारी कारवाईबाबत संकोचतात, असे सूत्रांनी सांगितले. पाकव्याप्त काश्मीर घेतल्यावर हा प्रश्न सुटू शकेल : जयशंकर चैथम हाऊसमधील कार्यक्रमात सहभागी जयशंकर यांनी पाकिस्तानी पत्रकाराच्या काश्मीर मुद्द्यावरील प्रश्नावर सांगितले की, आम्ही काश्मीरचा तिढा सोडवण्यासाठी चांगले काम केले. कलम ३७० हटवणे हे महत्त्वाचे पाऊल होते. विकास, आर्थिक व्यवहार, सामाजिक न्याय बहाल करणे हे दुसरे पाऊल होते. निवडणुकाही घेतल्या, त्यात चांगले मतदान झाले. काश्मीरचा चोरलेला भाग परत मिळावा. तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे. हे घडेल तेव्हा काश्मीरचा तिढा सुटलेला असेल. याबद्दल खात्री बाळगा, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान सरकारने मात्र गुरुवारी त्यांचे वक्तव्य फेटाळले. तेव्हा सरकारने कट्टरवाद्यांची आर्थिक रसद रोखली, आता बिनबोभाट सुरू.. सुनक यांनी २०२३ मध्ये टास्क फोर्सला १ कोटी रुपयांचा निधी दिला होता. यातून खलिस्तानी समर्थक कट्टरवादाचा धोका जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. – दोन वर्षांनंतरही स्टार्मर सरकारने काहीही तरतूद नाही. सुनक यांनी खलिस्तानी गट व समर्थकांच्या ऑनलाइन व ऑफलाइन निधी उभारणीवर निगराणी ठेवली. मग खलिस्तानी नेटवर्क तुटू लागले. संघटना जाहीर देवाण-घेवाणही टाळत होती. -स्टार्मर सरकारमध्ये संशयित गटावर निगराणी नाही. सुनक सरकारने शीख समुदायासोबत सक्रिय काम केले. यातून गुरुद्वारा, धर्मार्थ संघटनांचा वापर आर्थिक रसदीसाठी केला जाऊ नये याची खबरदारी घेतली गेली. तेव्हा काही गुरुद्वारांना चौकशीला तोंड द्यावे लागले. – मजूर पक्षाचे सरकार शीख समुदायात कट्टरवादाबद्दल काही चर्चा करत नाही.

Share