रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर टीका:म्हणाल्या – सुनेचा छळ करणार्‍याला उमेदवारी देणे हाच का महिला सन्मान?

वडगाव शेरी मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बापु पठारे यांच्यावर त्यांच्याच सुनेने विनयभंग आणि मानसिक छळाची तक्रार केली. अशा व्यक्तीला उमेदवारी हाच का तुमचा महिला सन्मान अशी खोचक टीका महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळेवर यांच्यावर केली आहे. येरवडा येथील प्रचाराच्या सभेत खासदार सुळे यांनी आमदार सुनिल टिंगरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. टिंगरे यांनी शरद पवार यांना बदनामी केल्या प्रकरणी नोटीस पाठविली असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चाकणकर यांनी म्हटले आहे, नोटीस पाठविली यात कोणतेही तथ्य नाही. मात्र, वैफल्यग्रस्तामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विरोधात अशी चुकीची विधाने ते करीत आहेत. तसेच ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी वडगाव शेरी मतदारसंघात आले होता, त्या पठारेंवर त्यांच्या सुनेने विनयभंग, शारिरिक व मानसिक अत्याचार या विरोधात गुन्हे दाखल केले होते. अशा माणसाला उमेदवारी दिली हा कोणता महिला सन्मान असा प्रश्न चाकणकर यांनी उपस्थित केला आहे. पवारांना नोटीस दिली नाही – आमदार टिंगरे मी शरद पवार यांना नोटीस दिलेली नाही. ज्या घटनेशी माझा संबध नाही, त्या घटनेवरून महाविकास आघाडीतील काही नेते आणि प्रवक्ते मला बदनाम करीत असतात. विधानसभा निवडणूकीत माझी बदनामी करू नये यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना नोटीस दिली होती. मात्र, मी पवारांना नोटीस बजावली असा चुकीचा प्रचार करून त्यांचे भांडवल केले जात असल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले.

Share