साकोली डेपोत बसफेरीचे काम लावण्यावरून वाद:वाहन परीक्षकाची चालकाला बेदम मारहाण

साकोली बसस्थानकात बस क्रमांकानुसार लावण्याच्या कारणावरून अधिकाऱ्याने चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. हा वाहन अधिकारी एका चालकाच्या छातीवर बसून बेदम मारहाण करण्याचा विडीयो भंडारा जिल्ह्यातील साकोली व परिसरात सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. याप्रकरणी कामात ढवळाढवळ करणाऱ्या व चालकाला बेदम मारहाण करणाऱ्या वाहन परीक्षक प्रदीप करंजेकर यांची बदली इतरत्र करावी, अशी मागणी केली जात आहे. साकोली बसस्थानक येथे आगार प्रवेशद्वारा समोरच वाहन परीक्षक प्रदीप करंजेकर हे चालक पंकज काटनकर यांच्या छाताडावर बसून अश्लील शिव्या देत बेदम मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत स्वतः आगार व्यवस्थापक सचिन आगरकर तसेच एक महिला अधिकारी, वाहतुक नियंत्रक एकनाथ शहारे, कुणाल लिखार आणि सुरक्षा कर्मचारी सुद्धा दिसत आहेत. चालक पंकज काटनकर हे त्यांची बस फेरी कामगिरी व्यवस्थित का लावत नाही, म्हणून हा वाद विकोपाला गेला असल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारचा वादविवाद या आगारात मागील दिड वर्षांपासून सुरू आहे. या घटनेत चालक पंकज काटनकर यांच्या पार्श्वभागावर मार लागला असून हातापायाला दांडक्याने बेदम मारहाण झाली आहे. घटनेतील जखमी चालक पंकज काटनकर यांनी एक्सरे काढून पोलीस तक्रार केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या गंभीर प्रकारानंतर वाहन परीक्षक प्रदीप करंजेकर यांची इतरत्र बदली करण्याची मागणी वाहन चालक वाहकांनी केली आहे.

Share

-