विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद:शिवसेना नेते आनंद दिघेंना हॉस्पिटलमध्ये मारले होते, त्यांचा घातपात- संजय शिरसाट

ठाणे जिल्ह्यावर किमान १९७० ते २००० अशी तीन दशके सत्ता गाजवणारे शिवसेना नेते अानंद दिघे यांच्या जीवनातील घटनांवर आधारित ‘धर्मवीर-२’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यातील दिघेंच्या मृत्यूविषयीच्या प्रसंगावर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना शिंदेसेनेचे प्रवक्ते, सिडको महामंडळाचे अध्यक्ष, आ. संजय शिरसाट यांनी ‘आनंद दिघेंना मारले होते. त्यांचा घातपात झाला होता,’ असा आरोप केला. दिघेंच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दिघेंच्या मृत्यूविषयीचा प्रसंगाचा संदर्भ देत मुंबई येथे खा. राऊत म्हणाले की, हा सिनेमा अत्यंत बोगस, बकवास, काल्पनिक आहे. त्यात दिघेंचा अपमान केला आहे. त्यावर छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत आ. शिरसाट म्हणाले की, हॉस्पिटलमधून डिस्चार्जआधीच दिघेंचा घातपात झाला होता हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये नेत्यांचे मृत्यू होतात. मात्र, ते हॉस्पिटल बंद केले जात नाही. दिघेंवर उपचार करणारे हॉस्पिटल अजूनही बंद का आहे. म्हणूनच दिघेंचा मृत्यूची चौकशी गरजेची आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे माझी तशी मागणी आहे. कुठले इंजेक्शन दिल्याने हृदयविकाराचा झटका आला शिरसाट यांनी असेही सांगितले की, उपचारानंतर दिघेंच्या जखमा भरल्या होत्या. मात्र त्यांना कुठलेतरी इंजेक्शन दिल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. धर्मवीरमध्ये असेही दाखवले आहे की, दिघेंच्या मृत्युनंतर एक व्यक्ती हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील काचेला धडक देऊन खाली कोसळून मरतो. ती व्यक्ती काचेला धडकून आपोआप कशी पडली असेल? तेव्हा तुम्ही शांत का बसला? : आनंद दिघे यांचे पुतणे, उद्धवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांचा सवाल आनंद दिघेंचे पुतणे, उद्धवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे म्हणाले की, आपण केलेली गद्दारी चांगल्या पद्धतीने मांडून आपली प्रतिमा सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न ही मंडळी करताना दिसतात. लोकांना तुमची गद्दारी लक्षात आहे. निवडणूक आली की दिघे साहेबांच्या नावाचं भांडवल करण्याचे काम अनेक लोक करतात. माझं थेट शिरसाटांना आव्हान आहे की, जर एकनाथ शिंदेंना ही गोष्ट माहिती होती, तुमच्या दैवतावरती घाला घातला जात होता तेव्हा तुम्ही इतकी वर्षे शांत का बसलात आणि आज २३ वर्षानंतर का प्रश्न उपस्थित करता? त्या षड््यंत्रामध्ये तुम्हीही सहभागी होतात का? दिघेंचा पुतण्या म्हणून मी त्यांना अग्नी दिला आहे. त्या अनुषंगाने मी कोर्टात जायला तयार आहे. चारचाकीला एसटीची धडक, जखमी दिघेंचा हॉस्पिटलात झाला होता मृत्यू २४ ऑगस्ट २००१ रोजी गणेशोत्सवानिमित्त दिघे गणपती दर्शनासाठी ठाण्यात फिरत होते. रात्री ३.३० सुमारास वंदना सिनेमा बसस्थानकाबाहेर त्यांच्या चारचाकीला एसटीने धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना सिंघानिया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. २६ ऑगस्टला सायंकाळी स्वतः आपली प्रकृती स्थिर आहे, काळजी करू नका, असे त्यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले. रात्री १०.३० वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांच्या मृत्यूची घोषणा झाली. गद्दारांना बोलण्याचा अधिकार नाही : आमदार अंबादास दानवे विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, गद्दारांना बोलण्याचा अधिकार नाही. शिरसाट यांना दिघेंच्या मृत्यूबद्दल काही माहिती असेल तर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी.

Share

-