सारवासारव:‘देशद्रोहा’चा आरोप, मलिकांचा प्रचार करण्यास भाजपचा नकार, आधी केला उमेदवारीला विरोध
भाजपच्या विरोधानंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात माजी मंत्री नवाब मलिक यांना शेवटच्या दिवशी एबी फॉर्म दिला. त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. मविआ सरकार असताना याच मलिक यांना देशद्रोही म्हणून भाजपने त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. आता महायुतीचे उमेदवार म्हणून भाजप त्यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. या मतदारसंघात समाजवादी पार्टीचेे अबू आझमी हे मविआचे उमेदवार आहेत. दरम्यान, भाजप नेते किरीट साेमय्या यांनी टि्वट करत ‘व्होट जिहाद आणि दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आम्ही लढू’, असा थेट इशारा दिला. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आम्ही मलिक यांचा प्रचार करणार नाही, असे जाहीर केले. दाऊदशी संबंधित मालमत्ता खरेदी, मनी लाँडरिंगसह देशद्रोहाच्या आरोपावरुन मविआ सरकारमध्ये मंत्री असताना मलिक यांना अटक झाली होती. ते जामिनावर बाहेर आले तेव्हा राष्ट्रवादीत दोन गट पडले होते व राज्यात महायुतीचे सरकार अाले होते. त्यावेळी मलिकांना अजित पवार गटात घेण्यास भाजपने तीव्र विरोध केला होता. आताही त्यांना उमेदवारी देऊ नका असा भाजपचा आग्रह होता. त्यामुळे अणुशक्तीनगरमधून मलिकांच्या जागी त्यांच्या कन्या सना यांना तिकिट देण्यात आले. मात्र मलिकांनी शिवाजीनगर- मानखुर्दमधून अपक्ष अर्ज भरला होता. शेवटच्या दिवशी त्यांना अजित पवारांनी एबी फॉर्म दिला. दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत माहिती नसल्याचा दावा केला. आमदार श्रीनिवास वनगा बेपत्ता पालघर मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट एकनाथ शिंदेंनी कापले. त्यामुळे सोमवारी वनगा प्रेससमोर रडले होते. मंगळवारी सकाळपासून ते घरातून बेपत्ता झाले असून त्यांचा फाेनही बंद आहे. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे वनगा यांच्या पत्नीने सोमवारीच पत्रकारांना सांगितले होते. त्यामुळे पोलिस चिंतेत पडले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.”