सतीश भोसले जातीय राजकारणाचा बळी:तो पारधी समाजाचा असल्यानेच कारवाई; वकील अंकुश कांबळे यांचा मोठा दावा
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाईवर अनेक आरोप होत आहेत. इतकेच नाही तर त्याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. त्याला प्रयागराज येथून अटक केल्यानंतर त्याला बीड न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र यावेळी सतीश भोसलेचे वकील अंकुश कांबळे यांनी मोठे दावे केले आहेत. सतीश भोसले हा राजकारणाचा बळी ठरला असल्याचा आरोप अंकुश कांबळे यांनी केला आहे. एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीने आमदाराचा कार्यकर्ता होऊ नये का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामध्ये सध्या जातीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. सतीश भोसले हा सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गरीब मुलांना वह्या व पुस्तकांचे वाटप,उस तोड कामगारांना रेशन तसेच धान्य पुरवणे, गरिबांना मदत करणे अशी कामे सतीश भोसले हा करत असतो. त्याचे चांगली काम समोर आणली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र त्याच्या भोवती खोटे आरोप केले जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसले याच्यावर काढला जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. सतीश भोसले याच्या प्ररकणात वड्याचे तेल वांग्यावर निघाले आहे. सतीश भोसले यांचे घर तोडले गेले, ते कुणालाही मान्य होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर शुक्रवारी होळीच्या दिवशी अज्ञात व्यक्तीने सतीश भोसले यांचे घर पेटवून दिले होते. यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू जाळण्यात आल्या असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. इतकेच नाही तर या ठिकाणी असलेल्या महिलांना देखील मारहाण केली असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. सतीश भोसले याला घेऊन बीड पोलिस महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. प्रयागराजहून त्याला छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले आणि तिथून त्याला बीडच्या शिरूर कासार येथे नेण्यात आले आहे. तिथे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यानंतर सतीश भोसले याला 20 तारखेपर्यंत पोलिस काठडी सुनावली आहे. या दरम्यान आता त्याच्याव वकिलांनी अनेक मोठे दावे केले आहेत.