सत्तेवर आल्यावर 48 तासांत मशिदींवरील भोंगे उतरवणार:लाऊडस्पीकरचा कुराणमध्ये उल्लेख आहे का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सवाल

विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. शुक्रवारी राज ठाकरे यांनी ठाणे व कल्याण येथे सभा घेत राज्य समृद्ध करण्यासाठी मनसेला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना सत्तेवर आल्यावर 48 तासांच्या आत मशिदींवरील लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवेल, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. 48 तासात मशिदीवरील भोंगे उतरवू
राज ठाकरे म्हणाले, मशिदीवरील भोंगे काढले पाहिजे, यात दुमत नाही, असे सांगत आमची सत्ता आली तर 48 तासात मशिदीवरील भोंगे उतरवून सर्वांना वठणीवर आणू, असे ठाकरे म्हणाले. सगळ्या स्वतःच्या सोयीनुसार धर्माच्या गोष्टी सुरू आहेत. हिजाब आणि व्याज घेऊ नये, असे कुराणमध्ये लिहिले आहे. मग, लाऊडस्पीकरचा कुराणमध्ये उल्लेख आहे का, अशी विचारणा करत प्रत्येकाने आपला धर्म घरातील उंबरठ्याच्या आत ठेवावा. दुसऱ्यांना त्रास देणे असा कुठला धर्म आहे? लाऊडस्पीकर लावण्याऐवजी अलार्म लावा, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे. निवडणुका म्हणजे आता खेळ होऊन बसलाय
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, गेले अनेक वर्षे त्याच, त्याच विषयांवर निवडणुका लढल्या जात आहेत. गेले ५० वर्षे शिक्षण, आरोग्य, पाणी अशा मूलभूत गरजा आजही संपलेल्या नसून याच विषयांवर आजही निवडणुका लढविल्या जात आहेत, त्यामुळे येथील तरुणांना नवीन सुचणार कसे? विकास, नागरी समस्यांच्या विषयावर कोणीही आमदार, खासदारांना प्रश्न विचारत नाही. निवडणुका आल्या की आपणही त्यांचे गुलाम असल्यासारखे मतदान करतो. निवडणुका म्हणजे आता खेळ होऊन बसलाय, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. चिखलातून महाराष्ट्राला आपणास बाहेर काढायचे आहे
पाच वर्षात एकदा मनसेला नाशिकची सत्ता मिळाली. त्यावेळी पाच वर्षात सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मनसे हा एकमेव पक्ष आहे की नागरिकांना भुलविणारे आश्वासन देण्याऐवजी आम्ही काय कामे करणार अन कशी करणार हे सांगितले आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मागील पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय तमाशा आपण पाहिला आहे. या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातून महाराष्ट्राला आपणास बाहेर काढायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. मनसेच्या जाहीरनाम्यात काय आहे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी ‘आम्ही हे करू’ असे नाव दिले आहे. मनसेच्या जाहीरनाम्यात, पिण्याचे पाणी, महिलांची सुरक्षा, शिक्षण, रोजगार, वीज, कचरा व्यवस्था, इंटरनेटची उपलब्धता, क्रीडांगणे आणि राज्याच्या उद्योगाला चालना देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सत्तेत आल्यानंतर मराठी अस्मिता, मराठी साहित्य, गड किल्ले संवर्धन आणि महाराष्ट्राशी संबंधित सर्व ठिकाणे समृद्ध करण्यावर भर असेल, असे त्यात सांगण्यात आले आहे.

Share

-