दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर:दोन शिफ्टमध्ये होणार परीक्षा, पाहा परीक्षांचा कालावधी

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत दहावी बोर्डाची परीक्षा होणार आहे. तसेच 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत बारावी बोर्डाची लेखी परीक्षा होणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या अंतिम वेळापत्रकाबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या या परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्या जाणार आहेत. पहिली शिफ्ट ही सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत असणार आहे, तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत असणार आहे. दहावीच्या परीक्षेची सुरुवात मराठीच्या पेपरने होणार आहे, तर बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळापत्रक डाउनलोड करता येऊ शकते. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी 2025 मध्ये जारी करण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर हॉल तिकीट उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अडीच ते 3 महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या कामात देखील शिक्षक कार्यरत होते आणि आता निवडणूक पार पडताच बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. CBSE परीक्षा वेळापत्रक
सीबीएसई परीक्षांचे देखील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असून 15 फेब्रुवारी रोजी असणार आहे. या परीक्षांचा कालावधी 15 फेब्रुवारी ते 18 मार्च असा असणार आहे. तसेच बारावीच्या परीक्षांचा कालावधी 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल असणार आहे.

Share

-