शालेय शिक्षणमंत्र्यांची शाळेला अचानक भेट:विद्यार्थ्यांसोबत बाकावर बसले, वाचन करून घेतले; शिक्षकांच्याही जाणून घेतल्या समस्या

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी मालेगाव तालुक्यातील देवारपाडे या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी बाकावर बसून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, अपेक्षा आणि शाळेच्या विकासासाठी लागणाऱ्या गरजांची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. नागपुरातील विधिमंडळ अधिवेशन पार पडल्यानंतर आता सर्वच मंत्र्यांनी नव्या खात्याचा पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. शालेय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी दादा भुसे यांच्याकडे आली आहे. दादा भुसे यांनी पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात केली असून अचानक शाळांना भेटी दिल्या. मालेगाव तालुक्यातील देवरपाडे गावातील शाळेत ते पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन करुन घेतले. कविता म्हणून घेतल्या. मराठी आणि इंग्रजी कविता विद्यार्थ्यांनी म्हटल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा मानस असून त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरुन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे भुसे यांनी या दौऱ्यात सांगितले. आजकाल आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी दाखल करण्याचा पालकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते. परंतु येत्या काळात ही परिस्थिती बदलेल आणि शैक्षणिक दर्जा उंचावल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमातील शाळांच्या तुलनेत नक्की वाढलेला दिसेल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला. हे ही वाचा… शिक्षण मंत्री आता ग्रामीण भागातील शाळेतही दिसणार:गरीब पाल्याला चांगले आणि उत्तम शिक्षण देण्याचे उद्दिष्ट, मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली. शिक्षण मंत्री आता ग्रामीण भागातील शाळांमध्ये दिसेल, असे ते म्हणाले. नेहमीप्रमाणे शिक्षण विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम तुम्हाला दिसेल, असा विश्वासही दादा भुसे यांनी व्यक्त केला. सविस्तर वाचा…

Share