अमरावतीच्या दोन शाळांवर उत्कृष्टतेची मोहोर:36 लाखांची बक्षीसे जि.प. ची कन्या शाळा प्रथम

अमरावती जिल्ह्यातील दोन शाळांवर राज्य शासनाने उत्कृष्टतेची मोहोर उमटवली आहे. यामध्ये खासगी व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकेका शाळेचा समावेश आहे. यापैकी एक शाळा विभागात प्रथम तर दुसरी शाळा द्वितीय स्थानावर आली आहे. त्यामुळे अनुक्रमे २१ आणि १५ अशी ३६ लाख रुपयांची बक्षीसे मिळाली आहेत. राज्य शासनातर्फे गेल्या काही दिवसांत ‘मुख्यमंत्री : माझी शाळा – सुंदर शाळा’ असा प्रकल्प राबविण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये असलेल्या सोयी-सुविधा, शिकविण्याची पद्धत, शाळा परिसर, शिक्षक-पालक संघाचे कामकाज, शिक्षकांमार्फत केल्या जाणाऱ्या नाविण्यपूर्ण बाबी आदींवर भर देण्यात आला होता. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अशा दोन गटांत ही स्पर्धा भरवण्यात आली होती. त्यानुषंगाने अमरावती विभागातून प्रत्येकी तीनशेवर शाळांनी सहभाग नोंदवला होता. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींद्वारा संचालित शाळांचा त्यात समावेश आहे. यापैकी मोजक्या शाळा जिल्हास्तरावर पात्र ठरुन विभागस्तरावर पोचल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे दोन्ही गटांतून पाच-पाच शाळांमध्ये ही स्पर्धा झाली. यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनामार्फत संचालित कॅम्प भागातील गर्ल्स हायस्कुल नावाने कन्या शाळा प्रथम क्रमांकावर आली. त्यामुळे या शाळेला २१ लाख रुपयांचे पहिले बक्षीस घोषित झाले आहे. त्याचवेळी खाजगी व्यवस्थापनाच्या गटातून अंजनगाव सुर्जी येथील सिताबाई संगई कन्या शाळा ही विभागातून द्वितीय स्थानावर आली आहे. त्यामुळे या शाळेला १५ लाख रुपयांचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील दोन शाळांना एकत्रीतपणे ३६ लाख रुपयांची बक्षीसे मिळाली आहेत. ५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. त्यासाठी १५० गुण ठेवण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात सर्व शाळा तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी एक-दुसऱ्यांशी लढल्या. त्यानंतर जिल्हा व त्याहीपुढे विजयी झालेल्या शाळांची विभागस्तरावर स्पर्धा झाली. अशाप्रकारे अमरावती जिल्हा परिषदेची गर्ल्स हायस्कुल ही सरकारी शाळांच्या गटात विभागस्तरावर प्रथम आली. तर अंजनगाव सुर्जी येथील सिताबाई संगई कन्या शाळा ही खाजगी शाळांच्या गटातून विभागस्तरावर दुसरी ठरली. बक्षीसाच्या रकमेतून या शाळांना विकासांची कामे करता येतील. दोन्ही शाळा मुलींच्या विभागस्तरावर बक्षीसे मिळवणाऱ्या दोन्ही शाळा मुलींच्या आहेत. अमरावती जिल्हा परिषदेतर्फे चालवली जाणारी अमरावतीची (कॅम्प) जि.प. गर्ल्स हायस्कुल आणि अंजनगाव सुर्जी येथील सिताबाई संगई शाळा या दोन्ही शाळा मुलींच्या आहेत. दरम्यान या शाळांची निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील महिला वर्गाने विशेष आनंद व्यक्त केला आहे.

Share

-