दुबईत पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन:अध्यक्षपदी साहित्यिका डॉ. मोना चिमोटे यांची निवड

दुबई येथे डिसेंबर महिन्यात भरणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अमरावतीच्या महिला साहित्यिकाची निवड झाली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे यांना हा मान मिळाला. छत्रपती संभाजीनगर येथील मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका आणि पुण्याच्या संस्कृती प्रकाशनाने या संमेलनाचे आयोजन केले आहे. दुबईत भरणारे हे पहिले संमेलन ५ ते १० डिसेंबर दरम्यान होईल, असे मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ. महेश खरात यांनी जाहीर केले. डॉ मोना मिलिंद चिमोटे या साहित्य समीक्षक व संशोधक असून लेखिका म्हणून त्यांची ओळख आहे. ‘रहस्यकथा या कथाप्रकाराचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावरील शोधप्रबंधासाठी डॉ. चिमोटे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य ही पदवी प्रदान केली आहे. ‘मराठी विज्ञान कथात्म साहित्याचा समाजावर होणारा परिणाम’ या विषयावर त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाचा पोस्ट डॉक्टरेट अवॉर्डही प्राप्त झाला आहे. ‘अनुवादीत विज्ञान कथात्म साहित्याचा मराठी विज्ञान कथात्म साहित्यावर झालेला प्रभाव’ या विषयावर त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचा मेजर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला. मराठी संकेतस्थळांची सूची, कवी अज्ञात यांची स्वच्छंद,अनुकंपा, डोहतळ, स्नेहदग्ध, ओघळांचे नकाशे, अनन्यशर आणि ”अज्ञातवास : एक काव्यखंड” इत्यादी काव्यसंग्रहांचे संपादन त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या ”पळसबंध” या ललित लेखसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिवाय त्याचा हा संग्रह महाराजा सयाजीराव विद्यापीठातील बी.ए.भाग दोनसाठी मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यांचे ”कालखंडाचा साहित्याभ्यास” हे पुस्तक मुक्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. साठहून अधिक चर्चासत्र, परिसंवादात सहभाग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विश्व मराठी साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन अशा विविध साहित्य संमेलनातील चर्चासत्रांमध्ये डॉ. मोना चिमोटे यांनी सहभाग नोंदवला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील साठपेक्षा अधिक चर्चासत्र व परिसंवादांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. नामवंत साहित्यिक व कलावंतांच्या प्रकट मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील विविध चर्चांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारीणी सदस्य म्हणून त्यांनी योगदान दिले आहे.

Share

-