सेनगाव पाटीजवळ भरधाव वाहनाची दुचाकीला धडक:दोघे ठार, एक गंभार जखमी, वाहनाबाबत नर्सी नामदेव पोलिसांची लपवा छपवी

हिंगोली ते सेनगाव मार्गावर पुसेगाव पाटी जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री हा अपघात झाला. अपघातातील गंभीर जखमीला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. मात्र, अपघातात धडक देणाऱ्या वाहनांबाबत नर्सी नामदेव पोलिसांकडून लपवा छपवी सुरु असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील शेख सत्तार (50) व गौतम धाबे (50) हे दोघे पुसेगाव शिवारातील एका ढाब्यावर काम करीत होते. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ढाब्यावरील काम आटोपून शेख सत्तार, गौतम धाबे व गावातील बबन धाबे हे तिघे जण दुचाकी वाहनाने पुसेगावकडे निघाले होते. यावेळी पुसेगाव पाटीजवळ भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात शेख सत्तार यांचा जागेवरच मृ्त्यू झाला तर गैातम व बबन हे दोघे गंभीर जखमी झाले. एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू या अपघाताची माहिती मिळताच नर्सी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बद्रीनाथ सानप, उपनिरीक्षक नागोराव जाधव, जमादार विलास कुटे, गणेश नरोटे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र गौतम यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बबन यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहनाबाबत पोलिसांची लपवा छपवी दरम्यान, या अपघातात दुचाकीला धडक देणाऱ्या वाहनांबाबत नर्सी नामदेव पोलिसांकडून लपवा छपवी सुरु आहे. या संदर्भात नर्सी नामदेवचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बद्रीनाथ सानप यांच्याशी संपर्क साधला असून आपण दवाखान्यात असल्याचे सांगितले. तर उपनिरीक्षक नागोराव जाधव यांनी माहिती घेतो असे सांगितले. जमादार कुटे यांनी वाहन ताब्यात घेतलेच असेल, असे मोघम उत्तर दिले तर जमादार गणेश नरोटे यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे नेमके वाहनाबाबत काय प्रकार सुरु आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

Share

-