शरद पवारांचा मोठा नेता अजित पवारांच्या गळाला?:उत्तम जानकर यांची गाडीत बसून चर्चा; उमेश पाटील चांची देखील उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे झाले असले तरी या दोन्ही पक्षातील नेत्यांचे एकमेकांच्या पक्षात येणे जाणे सुरूच आहे. अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांची साथ दिली. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर आता ते पुन्हा अजित पवार यांच्यासोबत जात आहेत. त्यातच आता शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत पुण्यात एकाच गाडीतून प्रवास केला. या दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. यावेळी जाणकार यांच्यासोबत उमेश पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे आता या घडामोडीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. उत्तम जानकर आणि अजित पवार यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील उजनी धरणातून पंधरा दिवस आधी पाणी सोडण्याची जानकर यांनी मागणी केली असल्याचे सांगितले आहे. इतकेच नाही तर अजित पवार यांना भेटणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती. गर्दीमुळे अजित पवार यांच्या गाडीत बसूनच या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती देखील उमेश पाटील यांनी दिली आहे. उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम विरोधात पुकारण्यात आलेला आंदोलनात उत्तम जानकर सर्वात आघाडीवर होते. त्यांच्या मतदारसंघातच बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी सर्वात आधी करण्यात आली होती. या घटनेची चर्चा देशभर झाली होती. त्यातच त्यांनी आता अजित पवार यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या आधी देखील राज्य सरकारने जयंत पाटील आणि उत्तम जानकर यांच्यासाठी पीएच नियुक्ती केली आहे. त्या पीएचा खर्च सरकारी तिजोरीतून केला जाणार आहे. या सर्व घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि उत्तम जानकर यांची भेट आणि त्यामागे असलेल्या राजकारण यावर आता चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.