शरद पवारांचा नवा राजकीय डाव:जुन्नरमध्ये अजित पवारांच्या आमदाराला पाडण्यासाठी निष्ठावंत उमेदवार उभा करणार?

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. तसेच विविध मतदारसंघांमध्ये रणनीती आखली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आता जुन्नर येथे अजित पवारांच्या नेत्याला घेरण्यासाठी नवीन डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जुन्नर येथील आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात शरद पवारांनी नवीन शिलेदार मैदानात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद माजी सदस्य मोहित ढमाले यांना शरद पवारांच्या पक्षाकडून येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. सध्या मोहित ढमाले जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विभाजन झाले तेव्हा मोहित ढमाले यांनी शरद पवारांच्या बाजूनेच राहण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे मोहित ढमाले हे शरद पवारांचे निष्ठावंत शिलेदार असल्याचे बोलले जात आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्यावेळी अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मते मिळवून देण्यात मोहित ढमाले यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. विधानसभा निवडणुकीसाठी मोहित ढमाले इच्छुक उमेदवार असल्याने त्यांना जुन्नर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूर येथून आमदार दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांनी पक्षात घेत उमेदवारी देखील देण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना चांगले यश आल्याने विधानसभा निवडणुकीसाठी देखील त्यांनी चांगलीच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत काय निकाल लागतो याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Share

-