शरद पवारांचा PM मोदींवर घणाघात:म्हणाले – मोदींचा संविधानात बदल करण्याचा डाव होता, पण आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शरद पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आबंडेकर यांच्या संविधानात बदल करण्याचा कट रचला होता. पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, असे ते म्हणाले. शरद पवार यांची शनिवारी उदगीर येथे सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संविधानात बदल करण्याचा कट रचल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 5-6 महिन्यांपूर्वी आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो. त्यावेळी देशाचे राज्य गेल्या 10 वर्षांपासून मोदींच्या हातात होते. देशातील शेतकरी वर्ग संकटात सापडला होता. त्याची अस्वस्थता घालवायची असेल तर मोदींना हलवून जागे करण्याची गरज होती. त्यासाठी आम्ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची इंडिया नावाची आघाडी स्थापन केली. त्यानंतर आम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत 400 हून जास्त जागा हव्या होत्या. त्यांनी यासाठी 400 पारचा नारा दिला होता. त्या घोषणेत काहीतरी पाप असल्याचा संशय आम्हाला आला होता. आमचा संशय अगदी खरा होता. या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात काही बदल करण्याचा डाव रचला होता. त्यातून जनतेच्या अधिकारांवर गदा येणार होती. हे कट कारस्थान पूर्ण करण्यासाठी मोदी व त्यांच्या सरकारला 400 च्या आसपास जागांची गरज होती. मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो. येथील जनतेने मोदी व शहांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले. यामुळे संविधानात बदल करण्याचा कट उधळला गेला, असे शरद पवार म्हणाले. महायुतीच्या काळात महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात पिछेहाट आज महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत. हे एक देशातील एक महत्त्वाचे राज्य आहे. हे राज्य शैक्षणिक चळवळीत प्रचंड योगदान देणारे आहे. शेतीतही महाराष्ट्राचे उल्लेखनीय योगदान आहे. पण ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आज महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत. काँग्रेस आघाडीच्या काळात आम्ही महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य बनवले. पण आता हा क्रमांक 6 वर घसरला. अनेक क्षेत्रांत महाराष्ट्र मागे पडले. उद्योगधंदे महाराष्ट्राचे वैशिष्ट होते. आम्ही साखर कारखानदारी काढली. अन्य कारखाने काढले. हाताला काम मिळेल याची व्यवस्था केली. पूर्वी ही कारखानदारी मुंबईपर्यंतच मर्यादित होती. ती मुंबईबाहेर कशी नेता येईल? याची काळजी आम्ही घेतली. आम्ही यासंबंधी अनेक निर्णय घेतले. शेतीवर आधारित कारखानदारीचे सूत्र अंमलात आणले. त्याचा मोठा फायदा राज्याला झाला. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात लातूर जिल्हा मागे राहिला नाही याचा मला आनंद आहे. पण आज अनेक कारखाने बंद पडलेत. त्यामुळे महायुतीच्या हातात सत्ता देणे हे शहाणपणाचे लक्षण नाही, असे शरद पवार म्हणाले.

Share

-