सरकारला बहिणींचे संरक्षण करण्यात अपयश:शरद पवारांचा आरोप; ‘वनवासी’ शब्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा

सध्याच्या राज्यकर्त्यांना महिला भगिनींचे संरक्षण करण्यात साफ अपयश आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी महायुती सरकारवर निशाणा साधताना केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. मोदींचा लोकसभेला 400 जागा जिंकून संविधान बदलण्याचा डाव होता. पण आम्ही तो हाणून पडला. आदिवासी हा कष्ट व शेती करणारा समाज आहे, मग हा वनवासी शब्द कुठून आला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शरद पवार यांची मंगळवारी नाशिकच्या कळवण – सुरगणा विधानसभा मतदारसंघात जे पी गावित यांच्यासाठी प्रचारसभा झाली. या सभेद्वारे त्यांनी महिला सुरक्षेवरून महायुती सरकारवर व संविधानात कथित बदल करण्याच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार म्हणाले, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या बहिणींना मदत करा. पण तिच्या संरक्षणाचीही जबाबदारी घ्या. एका शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला. राज्यात 20 वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या मुलींची संख्या 680 वर पोहोचली आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना भगिनींचे संरक्षण करता येत नाही. त्यामुळे आता त्यांचे संरक्षण करण्याचे काम महाविकास आघाडी करेल. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. राज्यात व देशात जे जंगल वाचले आहे ते आदिवासींमुळे वाचले. ते जंगल राखण्याचे काम करतात. हा आदिवासी कष्ट व शेती करणारा आहे. मग हा वनवासी शब्द कुठून आला? जे पी गावित यांनी आपील वैयक्तिक कामे केव्हाही मांडली नाही. त्यांनी केवळ आदिवासी शेतकऱ्यांची कामे सांगितली आहेत, असे शरद पवार म्हणाले. मोदींनी उभारलेला पुतळा 8 महिन्यांतच पडला शरद पवार यांनी यावेळी महायुती सरकारवर शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार केल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, आजच्या राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांविषयी किती आस्था आहे याविषयी संशय येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराजांचा पुतळा उभारला. पण 8 महिन्यांतच तो कोसळला. मुंबईमध्ये 1960 साली पुतळा उभारला. पण, इतक्या वर्षात त्याला कोणताही धक्का बसला नाही, अखंड वारे वाहत असतानाही तो उभा आहे. पण मोदींनी उभारलेल्या पुतळा 8 महिन्यांतच पडला. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांना पुन्हा निवडून द्यायचे नाही. मोदींचा घटना बदलण्याचा होता डाव ते पुढे म्हणाले, 6-7 महिन्यांपूर्वी देशात लोकसभा निवडणूक झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिला होता. 50 टक्क्यांहून कमी खासदार असतानाही मनमोहन सिंग यांचे सरकार टिकले होते. पण मोदी यांना 400 जागा कशासाठी पाहिजे होत्या? यांचा डाव वेगळा होता. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले होते, त्यात बदल करण्यासाठी त्यांना 400 खासदार हवे होते. आम्हाला शंका आली म्हणून सर्वच विरोधी पक्ष एकजूट झाले. आम्ही इंडिया आघाडी स्थापन केली. सर्वांनी मोदींचा धोका ओळखला. पण नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना दिली आणि त्यांचे सरकार सत्ते आले. आता ते आमचा संविधान बदलण्याचा हेतू नव्हता असे सांगत आहेत. पण त्यांचे खासदार व नेतेच मोदी साहेबांची घटना बदलण्याची इच्छा होती असा दावा करत आहेत. जनतेने बाबासाहेबांचे संविधान जतन करण्याचे काम केले. यासाठी त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. हे ही वाचा… शरद पवारांनी केला सदाभाऊ खोत यांचा गेम:रयत क्रांती पक्षाच्या बड्या नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’; खोतांवर व्यक्त केला अविश्वास मुंबई – सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. या माध्यमातून शरद पवार यांनी आपल्यावर अश्लाघ्य टीका करणाऱ्या खोत यांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सदाभाऊ खोत यांनी नुकतीच शरद पवार यांच्यावर अश्लाघ्य टीका केली होती. शरद पवार यांनी आपली महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. आता त्यांना महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे काय? असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. वाचा सविस्तर

Share