शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवारांच्या भेटीला:विधानसभा अधिवेशनादरम्यान राजकीय घडामोडींना वेग; चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सध्या या दोन्ही पक्षात घडणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोत रोहित पाटील आणि ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे देखील भेटीसाठी दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे हे देखील दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. मात्र, आपली ही भेट राजकीय नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा वाढली आहे. आपण आपल्या मतदारसंघातील कामाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांना भेटायला आलो असल्याची माहिती रोहित पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सलील देशमुख यांनी देखील घेतली अजित पवार यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली. आपल्या मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने आपण उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी देखील माध्यमंशी बोलताना सांगितले. मात्र गेल्या काही दिवसांपासून शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते अजित पवार यांची भेट घेत आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Share