मेळघाट मतदारसंघावर शिंदे सेनेचा दावा; समीकरण बदलणार:विद्यमान आमदार राजकुमार पटेल शिंदे सेनेच्या वाटेवर

अमरावती मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. राजकुमार पटेल हे प्रहार सोडून शिंदे सेनेच्या वाटेवर असून, त्यांचा काही कारणांमुळे अजूनही अधिकृत शिंदे सेनेत प्रवेश झाला नाही. त्यांनी प्रहारला सोडचिठ्ठी दिल्याचे जवळपास निश्चित झाले. प्रहारचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी मेळघाटात पटेल यांच्याविरोधात उमेदवार देऊ असे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेकडून पटेल यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपला हात चोळत बसावे लागेल. कारण, भाजपने त्यांच्या वाट्याच्या जिल्ह्यातील दोन मतदारसंघात पहिल्या यादीत उमेदवार निश्चित केले आहेत. त्याचवेळी महायुतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच असलेल्या मेळघाट, दर्यापूर, मोर्शी-वरुड, तिवसा, अमरावती, बडनेरा या सहाही मतदारसंघासाठी अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. मात्र, जिल्ह्यातील भाजप नेते, पदाधिकारी मेळघाटसह सर्वच मतदारसंघांसाठी दावा करत असले तरी त्यांचेही वेट अँड वॉच सुरू आहे. मेळघाटात २ लाख ९६ हजार १९६ मतदार आहेत. स्वातंत्र्यानंतर बराच काळ हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिला. त्यानंतर भाजपने या मतदारसंघात मुसंडी मारली. पटल्या गुरुजी, प्रभूदास भिलावेकर प्रत्येकी एकदा येथून निवडून आले. त्यानंतर राजकुमार पटेल कमळ चिन्हावर निवडून येत येथील आमदार बनले. अशात शिंदे सेनेसह भाजपही या मतदारसंघासाठी दावा करू शकतो. विद्यमान आ. पटेल येथून आधी भाजपच्या व नंतर प्रहारच्या तिकीटावर निवडून आले. ते शिंदे सेनेकडून यंदा लढल्यास येथील राजकीय समीकरण बदलू शकते. त्यामुळेच महायुती येथून कोणाला उमेदवारी देणार, याकडेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, तिसरी आघाडी बनवणारा प्रहार व महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. मेळघाटातील महायुतीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर ते आपले पत्ते उघडू शकते. सहकारी पक्षासाठी भाजप जागा सोडणार काय, याची उत्सकुता मेळघाटातील जागा सहकारी पक्ष शिंदेसेनेसाठी भाजप सोडणार काय असा प्रश्न आहे. कारण, भाजप नेते सातत्याने मेळघाटातून स्थानिक उमेदवार देण्याचा दावा करून वातावरण गरम ठेवत आहेत. यामुळे येथे भाजपविरोधात बंडखोरी होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. भाजप जिल्हाध्यक्ष खा. डॉ. अनिल बोंडे यांनी भाजप जिल्ह्यातील ८ पैकी जास्तीत जास्त मतदार संघात उमेदवार देणार असे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीतून मेळघाट मतदारसंघातील उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली.

Share