शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंचा शरद पवार गटात प्रवेश:राष्ट्रवादीकडून बीडमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा

विधानसभा निवडणकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नेत्यांची इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे. शिवसंग्रामच्या नेत्या तथा दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. सुप्रिया सुळे आणि शरद यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांना पक्षाकडून बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. ज्योती मेटे लोकसभेसाठीही होत्या इच्छुक
मराठा आरक्षणाबाबत नेहमी आग्रही राहिलेले शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलने झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सांगड घालण्यात येते असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ज्योती मेटे यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणूक देखील लढण्याची इच्छा होती. त्यासंदर्भात त्यांनी शरद पवार गटासोबत चर्चाही केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी बीड लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. व्यापक समाजहित लक्षात घेऊन बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत आहोत, असे ज्योती मेटे यांनी त्यावेळी सांगितले होते. शरद पवारांकडे नेत्यांची रांग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. भाजपचे हर्षवर्धन पाटील, अजित पवार गटाचे दीपक चव्हाण बबन तसेच फलटण येथील निंबाळकर गटाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केला आहे. तर माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे ते देखील तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यात आता शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनीही आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे यश पाहता लोकांचा शरद पवारांवर विश्वास वाढला असे, पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. हेही वाचा… अजितदादा गटाला पुन्हा धक्का?:आमदार बबन शिंदे शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर; राजकीय चर्चांना उधाण अजितदादा गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. बबन शिंदे यांना शरद पवार गटाकडून माढ्यातून उमेदवारी हवी आहे, यापूर्वीही त्यांनी चार वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-