महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या:खासदार उदयनराजे भोसले यांचे आवाहन

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच दशकांमध्ये शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र त्यांनी मराठा आरक्षणासह पश्चिम महाराष्ट्राच्या सिंचन योजना लटकत ठेवल्या. त्यांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी इतरांना वंचित ठेवण्याचे काम केले. गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात विकासाची जी फळे आहेत ती महायुती सरकारमुळे दिसत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मतदार राजाने जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील लेक व्हयू हॉटेलमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी सातारा-जावळी या दोन तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्राचे प्रभारी अजय जामवाल, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सुनील काटकर, अविनाश कदम, भरत पाटील, सौरभ शिंदे, रंजना रावत, निशांत पाटील, अशोक मोने, माजी सभापती वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. खा.उदयनराजे भोसले म्हणाले, काँग्रेसने गेल्या 50 वर्षांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या सत्ता विकेंद्रीकरणाला मूठमाती देऊन घराणेशाही सुरू ठेवली आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे निर्णय बरीच वर्ष प्रलंबित राहिले होते. यशवंतरावांच्या यशवंत विचारांचा विसर काँग्रेसला पडला असून जातीय तेढ निर्माण करण्याचे पाप काँग्रेसने केले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते असताना महाराष्ट्रातील सिंचनाचे रोजगाराचे शिवाय मराठा आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित राहिले. हे प्रश्न सोडवण्यासाठी पवार यांचा कोणी हात धरला होता का? त्यांच्यावर कोणाचे दडपण होतं का? असे बरेच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. शिवरायांचा जनकल्याणाचा सर्व समावेशक विचार केंद्रात भाजपने आणि राज्यात महायुती सरकारने अमलात आणला आहे. विरोधकांनी महाराष्ट्राला भूलथापा देण्यात आलेले काही केले नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करताना स्वतः पहिले आत्मपरीक्षण करावे, अशी घणाघाती टोलेबाजी उदयनराजे यांनी केली. महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांना आपण भरभरून आशीर्वाद द्यावेत. जेणेकरून महाराष्ट्राची गेल्या पाच वर्षापासून ची प्रगती यापुढेही अखंड सुरू राहील. याकरिता महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील याकडे लक्ष द्या, असे आवाहन उदयनराजे यांनी केले. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलताना म्हणाले, निवडणूका आल्या की विरोधक आमदारकीसाठी बाशिंग बांधून तयार असतात. मात्र गेल्या पाच वर्षात विकासाचा कोणताही ठोस कार्यक्रम त्यांनी राबवलेला नाही. सत्तेच्या प्रवाहात असतानाही काहींनी केवळ काही न करता आमदारकीसाठी आता दावा ठोकला आहे. मात्र गेल्या पाच वर्षात सातारा व जावली तालुक्यात महायुतीच्या माध्यमातून प्रचंड विकास कामे झाली आहेत.

Share