ओढ्यातून वाहून आल्या 500 च्या नोटा!:सांगली जिल्ह्यात अजब प्रकार, पैसे गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी

सांगली जिल्ह्याच्या आटपाडी गावात असलेल्या एका ओढ्यातून चक्क पाचशे रुपयांच्या नोटा वाहताना दिसून आल्या आहेत. याचा व्हिडीओ देखिल व्हायरल होत आहे. ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयांच्या नोटा मिळवण्यासाठी नागरिक शोधाशोध करत असल्याचे देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आटपाडी गावातील गदिमा पार्कच्या समोरून वाहणाऱ्या ओढ्यात या नोटा वाहत आल्या होत्या. आटपाडी गावात शनिवारचा बाजार होता. या बाजरासाठी आलेल्या लोकांना या नोटा ओढ्यात वाहताना दिसून आल्या. अनेक लोक नोटांची शोधाशोध करण्यासाठी पाण्यात हात घालून पाण्यातील कचरा बाजूला करत नोटा सापडण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांना पाचशे रुपयांच्या नोटा सापडल्या देखील. यावेळी या ओढ्याजवळ लोकांनी चांगलीच गर्दी केली होती. यावेळी एका महिलेला पाचशेची नोट मिळाली व ही नोट परत करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी जुन्या पाचशे रुपयांच्या 14 नोटा, एक हजार रुपयांची जुनी एक नोट, एकूण 8 हजार रुपयांच्या जुन्या नोटा. नवीन पाचशे रुपयांच्या 4 नोटा, पन्नास रुपयांच्या 3, 10 रुपयांच्या अकरा, पाच रुपयांच्या 2, आणि वीस रुपयांची 1 नोट, अशा जुन्या नवीन एकूण 10 हजार 290 रुपयांच्या नोटा मिळून आल्या आहेत. या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी स्पेसिफाईड बँक नोट अ‍ॅक्ट २०१७ अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची पक्रिया सुरू आहे. आरोपीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, आटपाडी शहरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये. याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन डेप्युटी एसपी विपुल पाटील यांनी केले आहे.

Share

-