संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विधानसभेत जोरदार चर्चा:संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडांची गुन्हेगारांना फाशीची मागणी; तर विरोधकांचाही सभात्याग

बीड जिल्ह्यातील सरपंच सतोष देशमुख हत्या प्ररकणावरुन विधिमंडळात सलग दुसऱ्या दिवशी चांगलीच खडाजंगी झाली. विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आली असली तरी आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार नमिता मुंदडा यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत हा मुद्दा मांडला. या प्रकरणातील दोषांना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी या आमदारांनी केली आहे. तर यावरुन चर्चा करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग करत असल्याचे सांगितले.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घाला – संदीप क्षीरसागर सरपंच संतोष देशमुख यांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला आणि अजूनही यामागील मास्टरमाईंड सापडलेला नसल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यासंदर्भाच्या तक्रारी आपण वारंवार करत आहोत. त्या व्यक्तीचे नाव वाल्मीक कराड असल्याचे देखील संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड मिळतो तर एका गुन्हेगारी व्यक्तीला दोन बॉडीगार्ड कसे मिळतात? असा प्रश्न क्षीरसागर यांनी उपस्थित केला. त्याच्यावर खंडणीचा गुन्ह्या नोंदवण्यात आला असून वास्तविक हा 302 मध्ये कट रचला गेला होता. त्यामध्ये अद्यापही वाल्मीक कराड याचे नाव नसल्याचा आरोप देखील क्षीरसागर यांनी केला आहे. वाल्मीक कराड आणि या प्रकरणातील गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर या खूनची संपूर्ण माहिती आपल्यासमोर येईल, असा दावा देखील संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. मुख्यमंत्री महोदय चॅलेंज म्हणून ज्या पद्धतीने गडचिरोली जिल्हा घेतात, त्याप्रमाणे त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावे. आणि बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. हे अधिवेशन संपेपर्यंत वाल्मीक कराडला अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा बीड जिल्ह्यामध्ये निघणार असल्याचा दावा देखील क्षीरसागर यांनी केला आहे. गुन्हेगारांना फाशी द्या – आमदार नमिता मुंदडा संतोष देशमुख हे दोन वेळा सरपंच म्हणून निवडून आलेले आहे. संतोष देशमुख यांनी खूप चांगले काम केले आणि ते चांगले व्यक्ती होते. लोकप्रतिनिधी असून देखील राष्ट्रीय महामार्गावर अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. हे सर्व अतिशय भीतीदायक आहे. त्यांचे डोळे जाळण्यात आले आणि निघृन खून करण्यात आला असल्याचे नमिता मुंदडा यांनी म्हटले आहे. या घटनेला आठ दिवस झाले आहेत. तरी अद्याप या प्रकरणात सात आरोपी असताना, त्यातील केवळ तीनच आरोपी अद्याप पकडले गेले असल्याचे मुंदडा यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना पकडून आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी देखील नमिता मुंदडा यांनी केली आहे. या विरोधामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात संताप असल्याचे देखील नमिता मुंदडा यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून यातील दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी देखील नमिता मुंदडा यांनी केली आहे.

Share