विद्यार्थ्यांनी सर्वांगिण विकासासाठी शिक्षणासोबतच खेळालाही महत्व द्यावे:एबीएम इंग्लीश स्कुलमध्ये जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उदघाटन

विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकीज्ञान आत्मसात करण्यापेक्षा शिक्षणासोबत खेळालाही महत्व देऊन सर्वांगिण विकास साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बुधवारी ता. ५ येथे केले. हिंगोली शहरालगत लिंबाळामत्ता येथे एबीएम इंग्लीश स्कुल येथे आयोजित क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हाक्रीडाधिकारी राजेश मारावार, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, संस्थेचे अध्यक्ष दिलीप बांगर, अजिंक्य बांगर, मुख्याध्यापक के. जे. जोसेफ, राॅबिन वर्गीस उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करून त्यादृष्टीने आभ्यास करावा. तसेच जिद्दीने अभ्यास करून त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. एबीएम इंग्लीश स्कुलच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतूक करून शाळेच्या शैक्षणिक भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी मार्गदर्शन करतांना त्यांच्या शालेय जिवनातील आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळात सहभागी झालेच पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर क्रीडाधिकारी मारावार यांनी क्रीडाक्षेत्रातील संधी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकामध्ये संस्थाध्यक्ष बांगर यांनी शाळेच्या सर्वांगिण प्रगतीची माहिती दिली. तसेच शैक्षणिक सुविधा, शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विविध स्पर्धा या विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन विद्यार्थीनी कनिष्का हेडा, नक्षत्रा अरुण ,श्रेया घोंगडे, शरयू शेळके, यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य बांगर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. मल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्याक्षिक यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्याक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर यावेळी जिल्हाधिकारी गोयल, पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी तिरंदाजीचा आनंद घेतला.

Share