सुरेश धस यांना पुन्हा डावलले:बीड जिल्ह्यातीलच आमदार नमिता मुंदडा यांची विधिमंडळ समिती अध्यक्षपदी निवड; महायुती कडूनच धक्का
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार सुरेश धस यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असताना सुरेश धस यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सुरेश धस यांनी तशी संधी मिळाली नाही. त्यानंतर विधिमंडळ समित्यांमध्ये यांना प्रतिनिधित्व मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांना डावलत पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील आमदार नमिता मुंदडा यांची समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मागील काही महिन्यापासून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सुरेश धस यांना डावलले असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील धस यांना नियोजन समितीमधून डावलले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा धस यांना महायुती कडूनच धक्का देण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी बीड जिल्ह्यातून नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने भाजप आमदारांच्या झालेल्या नियुक्त्या पहा… अजित पवार यांनीही नियोजन समितीतून हटवले होते मस्साजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरण लावून धरणारे, या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीतून हटविण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला होता. हा निर्णय म्हणजे एक प्रकारे धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याची चर्चा होती. बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांच्या नावात अजित पवार यांनी बदल केला आहे. भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांचा हा निर्णय बीडच्या राजकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. आता भाजपनेही धस यांना डावलत नमिता मुंदडा यांना संधी दिली आहे.