सुषमा अंधारेंकडून हडपसरचा उमेदवार परस्पर जाहीर:सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाल्या – सुषमाताई त्या मीटिंगमध्ये होत्या का?

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा करत माजी आमदार महादेव बाबर यांना उमेदवारी देखील जाहीर केली. महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटप पूर्णपणे ठरले नाही. त्यात हडपसर जागेचा पेच देखील सुटला नाही. मात्र त्याआधीच सुषमा अंधारे यांनी मेदवार जाहीर केली. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली असून सुषमाताई त्या बैठकीत होत्या का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सुषमा अंधारे यांनी हडपसर मतदारसंघातून महादेव बाबर यांना उमेदवारी जाहीर केल्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले. त्यावर सुषमाताई त्या मीटिंगमध्ये होत्या का? असा सवाल सुळे यांनी केला. माझ्या माहितीनुसार काल झालेल्या बैठकीत त्या उपस्थित नव्हत्या. तरी मी त्यांना एकदा फोन करुन विचारेन, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अंधारे यांना लगावला आहे. पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, मी एक जबाबदार खासदार आहे. जागावाटप फायलन होईपर्यंत मी आऊट ऑफ लाईल बोलणार नाही. महाविकास आघाडीत गैरसमज होईल, असे वक्तव्य मी करणार नाही, असेही सुळे म्हणाल्या. काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे
सुषमा अंधारे काल एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, हडपसर हा मतदारसंघ आम्हाला सुटला असून या मतदारसंघातून माजी आमदार महादेव बाबर हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये कोणताही मनमुठाव नाही, सगळ्याच जागांवर एकमत होत आले आहे. हडपसरची जागा देखील क्लिअर झाली असून आता केवळ 15 ते 18 जागांवर चर्चा सुरू आहे.

हडपसर मतदारसंघात 2019 मध्ये काय चित्र होते?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती आणि काँग्रस-राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यावेळी युतीमधील जागावाटपात हडपसरची जागा भाजपला सुटली होती. तर आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली होती. हडपसर मतदारसंघात भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादीचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी भाजपचे योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले नव्हते. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केल्याने भाजपच्या योगेश टिळेकर यांचा पराभव झाल्याची चर्चा होती. 2019 ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढली होती. मात्र, निकालानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारुन पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवार देखील आपल्या आमदारांसह देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाले. हडपसरचे आमदार चेतन पाटील हे देखील अजित पवार गटात सहभागी झाले होते. आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये हडपसरच्या जागेवरुन रस्सीखेच सुरू आहे. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या जागेसाठी शरद पवारांकडून प्रयत्न सुरू आहेत. अशात ठाकरे गटाने या जागेवर दावा केल्याने पवारांची कोंडी झाल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीत ही जागा खरंच ठाकरे गटाला सुटली का? असा सवाल सुषमा अंधारेंच्या घोषनेनंतर उपस्थित झाला आहे.

Share

-